Sugar Factory  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Sugar Mills: अहिल्यानगरमध्ये साखर गाळपाला वेग; एक कोटी टनांचा टप्पा पार

22 कारखान्यांतून 88 लाख क्विंटल साखर उत्पादन; शेतकऱ्यांना 1708 कोटींचे पेमेंट, 613 कोटी एफआरपी थकीत

पुढारी वृत्तसेवा

गोरक्ष शेजूळ

नगर: जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा 22 साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला गती दिली आहे. कालअखेर एक कोटी टन गाळपाचा टप्पा ओलांडला असून, 88 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. या कालावधीत कारखान्यांकडून उसाच्या पेमेंटपोटी जिल्ह्यातील ऊसउत्पादकांच्या बँक खात्यांत तब्बल 1708 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सहकारी आणि खासगी अशा 22 साखर कारखान्यांनी साधारणतः दि. 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू केला. साखरसम्राटांची वाढती महत्त्वाकांक्षा आणि उसाचे कमी-अधिक होणारे क्षेत्र, यामुळे सर्वच कारखाने जास्तीत जास्त भाव देऊन आपल्याच कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांना आकर्षित करतात.

खासगी वरचढ; सहकार पिछाडीवर

बहुतांश कारखान्यांनी सरासरी तीन हजारांचा दर (पहिली उचल) जाहीर केला आहे. गौरी शुगर, स्वामी समर्थ आणि सोपानराव धसाळ या तीन खासगी कारखान्यांनी सर्वाधिक 3200 रुपयांचे पहिले पेमेंट जाहीर केले आहे. तर सहकारी कारखाने मात्र 3000 रुपयांपर्यंत झेप घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या कारखान्यांची उपपदार्थ निर्मिती आहे, त्यांनीही पहिली उचल 3000 रुपयांहून जास्त दिलेले नाही.

एक कोटी टन गाळप पूर्ण

कारखान्यांनी आतापर्यंत 1 कोटी 5 लाख टनांचे गाळप केले असून, 88 लाख क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. अजूनही साधारणतः 25 टक्के उसाचे क्षेत्र तोडणीसाठी उभे असून मार्चपर्यंत हा गाळप हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. आता अनेक कारखान्यांच्या टोळ्या कार्यक्षेत्रात परतीच्या वाटेवर आहेत.

613 कोटींची एफआरपी थकली

कारखान्यांनी ऊस तोडून नेल्यानंतर 14 दिवसांत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. आतापर्यंत गाळप झालेल्या एक कोटी मेट्रिक टन ऊस गाळपापोटी शेतकऱ्यांना सुमारे 2322 कोटी रुपये अदा करणे अपेक्षित होते. मात्र 31 जानेवारी 2026 अखेर सर्व कारखान्यांनी मिळून 1708 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. अजूनही 613 कोटी रुपये देणे बाकी आहे. ही रक्कमही वेळेत मिळाली असती तर अर्थचक्र अधिक गतिमान झाले असते, असे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT