नगर: जिल्ह्यातील जे सहकारी आणि खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारत शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असतील अशा कारखान्यांवर जिल्हा प्रशासनाने धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार तसेच पदमश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक कॅथलॅब युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमास शनिवारी (दि.1) नगरला आले असता डॉ. सुजय विखे पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गळीत हंगामपूर्व बैठकीत शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील साखर कारखाना व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. या आरोपाबाबत डॉ. विखे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, वजनकाटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
यासाठी जिल्हा प्रशासन जे पाऊल उचलेल त्याला आमचा पाठींबाच असणार आहे. साखर उतारा हा 13 टक्क्यांपेक्षा अधिक आला तरच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 3 हजार 550 रुपये दर उसाला देणे शक्य आहे. त्यासाठी साखर उतारा वाढविण्याची गरज आहे. आजमितीस डॉ. विखे पाटील आणि सहकार महर्षी थोरात या दोन्ही कारखान्यांचा उतारा सव्वाअकरा ते साडेअकरा टक्क्यादरम्यान आहे. उसउत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरच शेतकरी ऊस लागवड करेल. त्यातूनच साखर कारखाने टिकणार आहेत. त्यासाठी साखर उतारा वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.
जे कारखाने आपल्या कारखान्याचा साखर उतारा 9 ते 10 टक्के दाखवितात. ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. असा आरोप डॉ. विखे पाटील यांनी केला. अशा कारखान्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.