Sugar Factory 
अहिल्यानगर

Ahilyanagar Sugar Factory Elections: साखर कारखाना निवडणुकांची रणधुमाळी; गडाख, राजळे, घुले-लंघे गटांच्या हालचालींना वेग

मुळा, वृद्धेश्वर आणि ज्ञानेश्वर कारखान्यांसाठी अर्ज दाखल; अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार अंतिम राजकीय चित्र

पुढारी वृत्तसेवा

नगर: गडाख, राजळे, घुले ह्या सहकारातील दिग्गज सोयऱ्या धायऱ्यांच्या नेतृत्वातील मुळा, वृद्धेश्वर व ज्ञानेश्वर या तीन साखर कारखान्यांसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ‌‘मुळा‌’ कारखान्यात विरोधकांना 21 जागांवर उमेदवार देता येतील का, अशी परिस्थीती तयार झाली आहे. ‌‘वृद्धेश्वर‌’साठी सत्ताधारी राजळे विरोधात राजळेंनी काहीसा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. ज्ञानेश्वर कारखान्यासाठी मात्र घुले, लंघे, मुरकुटे अशा आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने चुरस वाढल्याचे चित्र आहे. अर्ज माघारीपर्यंत कसे समीकरणे जुळतात, याकडे लक्ष असणार आहे.

गडाख-लंघे संघर्ष तीव्र

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली खरी, मात्र, काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसअखेर त्यांच्या गटाकडून 21 जागांवर केवळ 13 इच्छुकांनीच अर्ज भरल्याचे ऐकायला मिळाले. असे असेल तर त्यांना लंगडा पॅनल उभा करून गडाखांचा सामना करावा लागणार आहे. तर सत्ताधारी गडाख यांच्या मंडळातून मात्र 81 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मुळा कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतच सभासदांचा ‌‘मूड‌’ लक्षात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी एकूण 94 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाकडून तब्बल 81 अर्ज दाखल करण्यात आले असून, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाकडून केवळ 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नामांकन अर्जांच्या तपशीलावरून काही मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः सोसायटी मतदारसंघातून विरोधी गटाचा एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तसेच इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती मतदारसंघ आणि घोडेगाव गटामध्येही विरोधी अर्ज नसल्याने त्या जागांवरही बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधकांच्या ‌‘युती‌’मध्ये बिनसलं

उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरून भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार निवडीवेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याची खंत व्यक्त केली. काही कार्यकर्त्यांच्या मते, उमेदवारी वाटपात समन्वयाचा अभाव राहिल्याने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात विरोधी गटाला यश आले नाही. अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

‌‘वृद्धेश्वर‌’मध्ये भावकी

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 19 संचालक पदांसाठी एकूण 44 उमेदवारी अर्ज निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी राजळे गटाविरोधात शिवशंकर राजळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ‌‘बिनविरोध‌’च्या आशा मावळल्या आहेत. परंतु, विरोधकांकडे पूर्ण पॅनल इतके उमेदवार नसल्याने ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी तितकीशी अवघड जाणार नसल्याचे बोलले जाते. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, कुशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे,प्रदीप पाटील, संदीप लोखंडे, बापूसाहेब पाटेकर यांनी यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, नारायण बर्डे, संभाजी गर्जे, उद्धव ससे, मल्हारी टकले, सुरेश आठरे, राजेंद्र गवळी, सिंधू बडे, शेषराव ढाकणे, बाळासाहेब गोल्हार, रामकिसन शिरसाट, शामराव गरड, अंबादास बळीद, काकासाहेब शिंदे, बाबासाहेब बर्डे, भाऊसाहेब उघडे आणि सुभाष आव्हाड यांनी अर्ज दाखल केले. सिंधू बडे यांनी दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून अर्ज भरल्याने अंतिम दिवशी 18 उमेदवारांकडून 19 अर्ज दाखल झाले.

माजी आमदार आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे यांनी तीन तर राहुल राजळे, सुभाष ताठे, बापूसाहेब पाटेकर, सिंधू बडे यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अधिक रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 18 जून आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

घुले-लंघे सहमती?

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी शेवटच्या दिवसाअखेर एकुण 240 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये घुले बंधूसह आमदार लंघे, माजी आमदार मुरकुटे यांच्या अर्जांचाही समावेश असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. दरम्यान, कारखाना निवडणुकीत घुलेंनी आतापर्यंत लंघेंना सोबत घेतले आहे. त्यामुळे यावेळीही घुलेंच्या संचालक मंडळात लंघे पहायला मिळणार का, यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे. त्यासाठी अर्ज माघारीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ज्ञानेश्वर कारखान्याची सत्ता नरेंद्र व चंद्रशेखर घुले या बंधुच्या नेतृत्वातील मंडळाकडे आहे. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत घुलेंच्या नेतृत्वातील संचालक मंडळात विठ्ठलराव लंघे पहायला मिळालेले आहेत. त्यामुळे घुले-लंघे यांची ‌‘समझोत‌’ एक्सप्रेस आता या निवडणुकीतही दिसणार की आमदार झाल्यानंतर लंघेंना स्वतःचा गट उभा करण्यासाठी ही निवडणूक घुलेविरोधात लढवावी लागणार, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, ॲड. देसाई देशमुख, आमदार विठ्ठलराव लंघे, जनार्दन पटारे, प्रा.नारायण म्हस्के, रावसाहेब निकम, बबनराव भुसारी, लताबाई मिसाळ, मच्छिंद्र म्हस्के, शिवाजी कोलते यांच्यासह इतर विद्यमान संचालकांसह काशिनाथ नवले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, रत्नमाला लंघे, सुमनबाई काळे, विजया म्हस्के, विठ्ठल अभंग, हिम्मतसिंह देशमुख, प्रभाकर कोलते, भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, देविदास पाटेकर आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. घुले हे लंघेंना सोबत घेणार का, लंघेंची भूमिका काय असेल, यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अन्यथा घुलेंविरोधात लंघेंसह विरोधक एकवटल्याचे पहायला मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT