Standing Committee Chairman Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Standing Committee Chairman: नगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी सुभाष लोंढे बिनविरोध

महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी दीपाली बारस्कर, उपसभापतिपदी वर्षा सानप; शहरातील नागरी समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

नगर: प्रशासकाच्या काळात शहरात मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात पाणीपट्टी व मालमत्ताकर वाढविण्यात आला आहे. त्यासंदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यासंदर्भात फेरविचार करण्यात येईल. त्यासाठी नगरसेवकांची एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा निर्धार महापालिका स्थायी समितीचे नूतन सभापती सुभाष लोंढे यांनी व्यक्त केला.

सभापतिपदाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर लोंढे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शहरातील नागरी समस्या व प्रलंबित प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. शहरात अनेक भागात आठ दिवसाला पाणी येते. त्यामुळे शहरात दररोज पाणीपुरवठा कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. शहरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यावर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे लोंढे म्हणाले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे सुभाष लोंढे यांची बिनविरोध निवड मंगळवारी घोषित करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी दीपाली बारस्कर व उपसभापतिपदी वर्षा सानप यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तिन्ही निवडी पीठासीन अधिकारी जिल्हा परिषद सीईओ आनंद भंडारी यांनी घोषित केल्या. सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. महापालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीसाठी सोमवार अखेरपर्यंत अनुक्रमे सुभाष लोंढे (भाजप), दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) व उपसभापती पदासाठी वर्षा सानप (भाजप) यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

मंगळवारी सकाळी पीठासीन अधिकारी भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. भंडारी यांनी एकेक अर्ज पुढे घेऊन ते वैध असल्याचे सांगत सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहारे उपस्थित होते. आनंद भंडारी यांनी लोंढे यांचे आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी दीपाली बारस्कर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निखील वारे, बाबासाहेब वाकळे, मनोज कोतकर, मनोज दुलम, सुरेश बनसोडे, सोनाबाई शिंदे आदींसह पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

दोन वर्षांचे ऑडिट करणार

महापालिकेत गेली दोन वर्षे प्रशासक होते. या काळात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कामांची पडताळणी करून चांगल्या कामांना बळ देण्यात येईल. चुकीच्या कामांवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे लोंढे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT