Prostitution Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Spa Raid: अहिल्यानगरमध्ये स्पा सेंटरवर छापा; देहविक्री रॅकेट उघड, चार महिलांची सुटका

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई; स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साई मिडास इमारतीमध्ये अँक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बुधवारी (दि.27) छापा घालून कथित देहविक्रीचा व्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, मालक, मॅनेजर, ग्राहक यांच्यासह चौघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन आदी 60 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

साई मिडास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या अँक्यूम मसाज पार्लर व स्पा सेंटरमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून पुरुष ग्राहकांबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस पथकाने पंचांसह सापळा रचून बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

त्यानंतर खात्री झाल्यावर रात्री 11.35 वाजता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये मॅनेजर अनिकेत अशोक बचाटे (वय 27, रा. कुंभारगाव, ता. करमाळा) व कामगार काळुराम भीमा समिंदर (वय 28, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर), ग्राहक सजन एस. (वय 45, रा. केरळ) हे आढळून आले.

तपासादरम्यान स्पा सेंटरचा मालक संतोष गणेश बघे (रा. छत्रपती संभाजीनगर) असल्याची माहिती समोर आली. स्पा सेंटरमधील विविध रूमची तपासणी केली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत महिला आढळून आली. चौकशीत संबंधित महिलांनी स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.

चार महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर, कामगार व ग्राहक अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई निरीक्षक वैद्य, निरीक्षक जगदीश भांबळ, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार नितीन उगलमुगले, सुधीर खाडे, छाया रांधवन, अर्चना काळे आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT