नगर: कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणात सासरा इकडे तर जावई तिकडे, त्याचबरोबर व्याही व्याही अन् साडू साडू वेगवेगळ्या पक्षांमध्ये पाहायला मिळाले. मात्र गेल्या अडीच तीन वर्षांत जिल्ह्यातील बहुतांश सोयरे धायरी महायुतीच्च्या मंडपाखाली आज एकत्र दिसत आहेत. उद्याच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही नगरची सोयरे धायत्यांनी ठरविल्यास सोधा पॅटर्नचा दबदबा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर कारखान्यांची निवडणुकीत नातेवाइकांची समझोता एक्सप्रेस पाहायला मिळालेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणूक कोणतीही असो, त्यात राजकीय पक्ष, विचारधारा आणि संघटनात्मक ताकदीइतकाच प्रभाव सोयरे-धायरे अर्थात ‘सोधा’ पॅटर्नचा राहिल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जिल्हा बँक निवडणूकही त्याला अपवाद नसल्याचे चित्र आहे. बँकेसाठी पॅनल ठरविताना ही मंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात नातेसंबंधांची मोठी गुंतागुंत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अनेकदा नगर जिल्ह्यात कोणत्याही एका राजकीय पक्षापेक्षा ‘सोयऱ्या-धायऱ्यांचे’ समीकरण अधिक महत्त्वाचे ठरते, असे निरीक्षण नोंदविले होते. राजकारणात नात्यागोत्यांचे विस्तृत जाळे असून, विशेषतः सहकार क्षेत्रातील साखर सम्राटांची लॉबी अनेक निवडणुकांचे चित्र बदलताना दिसली आहे.
विधान परिषद, विधानसभा किंवा महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका असोत, तसेच उमेदवारी खेचून आणण्याच्या प्रक्रियेतही या गणगोतातील समीकरणांचा प्रभाव जाणवत आला आहे. २००९ आणि २०१५ च्या विधान परिषद निवडणुकांमध्ये अरुणकाका जगताप यांच्या विजयापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘सोधा’ पॅटर्न राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आणि आजही त्याचे महत्त्व कायम आहे.
जिल्ह्यातील नातेसंबंधांची ही लॉबी विविध पक्षांत विभागलेली असली, तरी निर्णायक प्रसंगी विशेषतः निवडणुकांच्या वेळी कधी उघड तर बहुतांश वेळा पडद्यामागून एकत्र येताना दिसते. त्यामुळे निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करताना या समीकरणांचा विचार केला जातोच. एकेकाळी स्व. अरुणकाका जगताप, स्व. शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्या नातेसंबंधांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा प्रभाव निर्माण केला होता. कर्डिले भाजप, जगताप राष्ट्रवादी, तर कोतकर काँग्रेस अशी वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षात दिसले. दोन-तीन दशके या सोयऱ्या-धायऱ्यांनी विविध निवडणुकांत एकमेकांना आपली ताकद दाखवून दिली. कर्डिले भाजपमध्ये तर संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार, संदीप कोतकर हे काँग्रेसचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते. नातेगोते असले तरी पक्ष मात्र वेगवेगळे होते. नातेवाईकांचा विचार करत असताना, राज्याचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचेही नगर जिल्ह्याशी जवळचे नातेसंबंध आहेत. त्यांच्या बहीण डॉ. उषाताई या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी, तर दुसऱ्या भगिनी नीलिमाताई या माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी आहेत. आमदार प्राजक्त तनपुरे आणि क्षितिज घुले हे एकमेकांचे मावसभाऊ असून, जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत.
नरेंद्र घुले यांचे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नातेसंबंधांचाही राजकीयदृष्ट्या प्रभाव आहे. त्यांची कन्या चैताली या कोपरगावच्या आमदार आशुतोष काळे यांच्या पत्नी आहेत. दुसरी कन्या निवेदिता या उदयन गडाख यांच्या पत्नी आहेत. घुले-गडाख नातेसंबंध माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार मोनिका राजळे यांच्या कुटुंबांपर्यंतही पोहोचतात. थोरात यांच्या भगिनी या आप्पासाहेब राजळे यांच्या पत्नी असून, स्व. राजीव राजळे हे थोरात यांचे भाचे, तर आमदार मोनिका राजळे या भाचेसून आहेत. आप्पासाहेब राजळे यांची कन्या सुनीता या शंकरराव गडाख यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे आप्पासाहेब राजळे आणि यशवंतराव गडाख या व्याह्यांचा प्रभावही अनेक दशके जिल्ह्याच्या राजकारणात दिसून आला.
या संबंधात गडाख हे शिवसेना ठाकरे गटात, घुले राष्ट्रवादीमध्ये, थोरात काँग्रेसमध्ये, राजळे भाजपात, तनपुरे (पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटात) असे विखुरलेले दिसले. पक्ष वेगवेगळे असले तरी नातेसंबंधात दुरावा त्यांनी येऊ दिलेला नाही. सध्या चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख आणि अशोकराव काळे हे राजकीयदृष्ट्या प्रभावी व्याही मानले जातात. माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि नरेंद्र घुले हे साडू असले तरी राजकारणात फारसे एकत्र दिसले नाहीत; मात्र त्यांच्या विचारधारेत अनेकदा साम्य दिसून आले. आशुतोष काळे आणि उदयन गडाख हे साडू-साडू असल्याने घुले, गडाख आणि काळे कुटुंबांतील राजकीय संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जाते.
एकूणच, आज ‘सोधा’ पॅटर्नचा विचार करताना कर्डिले, कोतकर, जगताप यांच्यासह घुले-गडाख-काळे-तनपुरे-थोरात-राजळे या विस्तृत राजकीय लॉबीचा विचार करावा लागतो. सध्या महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. नातेसंबंधांच्या दृष्टीने पाहिले तर चंद्रशेखर घुले, आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले हे सर्व महायुतीच्या राजकीय परिघात आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाख सध्या वेगळ्या राजकीय भूमिकेत असले तरी सहकार क्षेत्रातील समीकरणांमध्ये ते घुले यांच्यासमवेत दिसू शकतात.
थोरात यांचा धागा नाते गुंफण्यात महत्त्वाचा?
महायुतीच्या मंडपाखाली एकत्र आलेल्या या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकीय नात्यांचा केंद्रबिंदू म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सर्व सोयरे-धायरे एकाच व्यासपीठावर दिसत असले, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हे समीकरण नेमके कोणाच्या नेतृत्वाखाली उभे राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे...
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मुळा कारखान्याचे कार्यक्षेत्र नेवासा आहे, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या भेंडा कारखान्याचे कार्यक्षेत्र देखील नेवासा व शेवगाव आहे, नंतर मोनिका राजळे यांच्या वृद्धेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र पाथर्डीसह शेवगाव आहे. या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुका सुरू असताना एकमेकांना विरोध न करता आपापले कारखाने बिनविरोध कसे काढून घेता येतील यासाठी ते समझोता एक्सप्रेसमध्ये बसल्याचे दिसले. घुले-राजळे एकाच मतदारसंघात असताना त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून आपापले कारखाने ताब्यात ठेवले. मुळा कारखान्यात तीन जागांसाठी निवडणूक असली तरी गडाखांनाही व्याही घुलेंची मदतच झाली, हेही खरे.