Share Market Fraud Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Share Market Fraud: शेवगावमध्ये शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी आरोपी अटकेत

८–१०% मासिक परताव्याचे आमिष; ५७.७५ लाखांची गुंतवणूक घेऊन फरार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

पुढारी वृत्तसेवा

नगर: शेवगाव येथे दत्तकृपा ट्रेडिंग कंपनी सुरू करून शेअर मार्केटमध्ये जादा परताच्या आमिष गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लक्ष्मण राजू पातकळ (रा. चापडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरील आरोपीने फिर्यादी दामू ऊर्फ दामोधर लक्ष्मण विघ्ने (रा. मंगरुळ बु.ता. शेवगाव) व साक्षीदार ठेवीदार यांना तुम्ही माझे दत्तकृपा ट्रेडिंगमध्ये पैसे जमा करा, ती रक्कम मी शेअर मार्केटमध्ये लावून त्याबदल्यात तुम्हाला 8 ते 10 टक्के मासिक परतावा देतो असे आमिष दाखवले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 57 लाख 75 हजार स्वीकारून गुंतवणुकीच्या रकमेचा परतावा दिला नाही. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आरोपी जानेवारी 2025 पासून फरार होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वरुड फाटा, चिखलठाणा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले.

त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलिस अंमलदार कावरे, डमाळे, आव्हाड व दक्षिण मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोपी लक्ष्मण पातकळ याने स्थापन केलेल्या दत्तकृपा ट्रेडिंगमध्ये ठेव स्वरूपात रक्कम ठेवली असेल व त्यांचे मूळ ठेव रक्कम ही परताव्यासह मिळाल्या नाही. ज्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, असे गुंतवणूकदारांनी कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT