School Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar School Timing Change: अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल; उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाचा निर्णय

सकाळी 7 ते 11 या वेळेत शाळा; ‘यलो अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नगर: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. शनिवारपासून (दि.18) उन्हाळी सुटी लागेपर्यंत शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‌‘यलो अलर्ट‌’ जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.

झेडपीच्या 3156 शाळा

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी वर्गाच्या 3 हजार 156 शाळा आहेत. या 1 लाख 88 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय 886 खासगी माध्यमिक शाळा आहेत. जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नियोजन करण्यात आल्याचे झेडपीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) भास्कर पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT