नगर: अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिताअंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व संकलन हा एक अत्यंत प्रभावी, कृतिप्रधान व जनजागृती करणारा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक संजय म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षक जयवंत पुजारी यांच्या देखरेखीखाली प्रकल्पाच्या समन्वयक स्वाती अहिरे यांच्या नियोजनातून यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
उपक्रमाच्या प्रारंभी ई-कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो, ई-कचऱ्यातील घातक रसायने कोणती, त्याचा मानवी आरोग्यावर व पर्यावरणावर होणारा परिणाम, तसेच योग्य व्यवस्थापन न झाल्यास भविष्यात उद्भवणारी संकटे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा भाषेत डिजिटल माध्यमाद्वारे व फलक, चित्रे व उदाहरणांच्या माध्यमातून विषय मांडण्यात आला. वापरात नसलेला मोबाईल, फुटलेली स्क्रीन, खराब बॅटरी, तुटलेले चार्जर, जुने हेडफोन, संगणकाचे सुटे भाग हे साधा कचरा नसून ते स्वतंत्रपणे संकलित करून अधिकृत केंद्रांकडे पाठवणे किती आवश्यक आहे, यावर भर देण्यात आला.
प्रकल्प समन्वयक स्वाती अहिरे यांनी या उपक्रमाचे नियोजन करताना शिका आणि कृती करा या तत्त्वावर भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देऊन न थांबता प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेण्यात आले. ई-कचरा वेगळा ठेवण्याची पद्धत, ओला व सुका कचरा व ई-कचरा यातील फरक, पुनर्वापर, पुनर्निर्मिती व कमी वापर या त्रिसूत्रीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
लघुचित्रपटाच्या व भाषणांच्या माध्यमातून ई-कचऱ्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर डिजिटल माध्यमाद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आले. यामुळे इतर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवर्ग आणि उपस्थित नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण झाली.