नगर: महिलेवर गोळी झाडून पसार झालेल्या तरुणाने कापूरवाडी येथे जाऊन स्वत:वर गोळी झाडत जीवनयात्रा संपविली. सावेडीतील भगवानबाबा चौक परिसरातील अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (दि.२३) भरदिवसा हा थरार घडला.
गोळीबारात जखमी महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. योगेश सोमनाथ डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ‘नाजूक’ कारणातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जखमी ३५ वर्षीय महिला भगवानबाबा चौकातील अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहते. ही महिला व डोंगरे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे होते. दोघेही अपार्टमेंटमध्ये असताना त्यांच्यात काही तरी कारणातून वाद झाला. त्यातूनच तरुणाने महिलेवर बंदुकीतून गोळी झाडली. त्यात महिला जखमी झाली. त्यानंतर डोंगरे तेथून पसार झाला.
माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, एलसीबीचे निरीक्षक संतोष मुटकुळे, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पसार झालेल्या तरुणांचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. या शोधादरम्यान कापूरवाडी परिसरात त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांनी या माहितीला दुजोरा दिला.