Ahilyanagar Mava Factory Raid: Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Mava Factory Raid: सावेडीत माव्याचा कारखाना उद्ध्वस्त; एलसीबीचा छापा, एकाला अटक तर साथीदार फरार

वैदूवाडीतील पत्र्याच्या खोलीत सुगंधी तंबाखू-सुपारीपासून मावा तयार; १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर: सावेडीतील वैदूवाडी भागात बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे. बबन रामा लोखंडे (वय ३२, रा. लोखंडी चाळ, वैदूवाडी, सावेडी, अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी सावेडीतील वैदूवाडी परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली. घटनास्थळावर मशिनच्या साह्याने मावा तयार करताना बबन लोखंडे याला पकडले.

त्याच्याकडून मावा बनवण्याचे इलेक्ट्रिक मशीन, तयार मावा, सुगंधीत तंबाखू, प्लास्टिक पुड्या असा सुमारे एक लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे कसून चौकशी केली असता मावा बनवण्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू व सुपारी मुकुंदनगर येथील मेहराज (पूर्ण नाव माहीत नाही) हा पुरवत असल्याचे उघड झाले. सध्या आरोपी मेहराज हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, अंमलदार शाहीद शेख, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, संदीप पवार, विजय ठोंबरे, गणेश धोत्रे, सागर ससाणे यांच्या पथकाने केली.

तोफखाना पोलिस काय करतात?

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यात ड्रग्ज व मावा यावर विशेष लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र अंमली पदार्थविक्री विरोधात कारवाई सुरू आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबीचे पथक येवून कारवाई करते मग तोफखाना पोलिस काय करतात असा प्रश्न उपस्‍थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT