पाथर्डी: निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला 15 टक्के निधी खर्च न केल्याच्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून, 16 डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा तालुकाध्यक्ष आकाश शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या वेळी सुभाष शिंदे, दयानंद शिंदे, योगेश साळवे, लता साळवे, योगिता खाते, आदित्य कोकणे, अनिल शिंदे, मनोहर चव्हाण, शाम तिजोरी, सुनील साळवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन करताना गटविकास अधिकाऱ्यांनी एक महिन्यात अहवाल देऊन संबंधितांवर कारवाई करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, निवडुंगे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या दुरुस्तीचा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वादळामुळे भवनाचे छत पूर्णपणे उडून गेले असून, ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दुरुस्तीची कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंत दलित बांधवांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात दलित समाजाने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोपर्यंत आंबेडकर भवनाची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत दलित वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा निधी खर्च करण्यास आम्ही परवानगी देणार नाही. तसेच दुरुस्ती लवकर न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीचा प्रश्न, ग्रामपंचायतीची निष्क्रियता आणि आंबेडकर भवनाच्या दुरुस्तीचा मुद्दा प्रशासनापुढे मांडला जाणार असून, 16 डिसेंबरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.