Crop Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Rain Deficit: अहिल्यानगरात ५२ टक्के पावसाची तूट; पावणेसहा लाख हेक्टरवरील खरीप पेरणी रखडली

केवळ १५ हजार हेक्टरवरच पेरणी; बळीराजा पेरणीजोग्या पावसाच्या प्रतीक्षेत, कृषी विभागाची चिंता वाढली

पुढारी वृत्तसेवा

दीपक ओहोळ

नगर: पावसाळा सुरु होऊन २७ दिवस उलटले. या कालावधीत ९७.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४६.८ मिलिमीटर झाला. अपेक्षित पावसाच्‍या तुलनेत ५२ टक्‍के पावसाची तूट आहे.

आतापर्यंत फक्‍त १५ हजार ४० हजार हेक्‍टर म्‍हणजे २.५९ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली. पेरणीजोगा पाऊस नसल्‍याने पावणेसहा लाख हेक्‍टर क्षेत्रावरील खरीप पेरणी रखडली आहे. बळिराजा मनातच ‘पड रे बाबा, एकदाचा ’ असे म्‍हणत आशाळभूतपणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

यंदा ‘अल निनो’चा प्रभाव असल्‍याने यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्‍याचे म्‍हटले जात आहे. त्‍याचाच प्रत्‍यय जिल्ह्यात दिसून आला आहे. पावसाळ्याचा एक महिना संपत आला तरी अपेक्षित पावसाची नोंद झाली नाही. गेल्‍या वर्षी याच दिवशी सरासरी ८० मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा मात्र ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जवळपास ५०.६ मिलिमीटर पावसाची तूट आहे. कर्जत तालुक्‍यात मात्र १२२ टक्‍के म्‍हणजे सर्वाधिक ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जामखेड, श्रीगोंदा या तालुक्‍यांत सरासरी ७० टक्‍के पावसाची नोंद झाली. मात्र, राहाता, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव व श्रीरामपूर या सहा तालुक्‍यांत सरासरी १४ टक्‍के पाऊस झाला आहे. खरीप हंगामातील बाजरी, भात, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांच्‍या पेरणीसाठी शेताची मशागत करुन तसेच महागाडे बियाणे खरेदी करुन बळीराजा सज्‍ज आहे. परंतु पावसाने ओढ दिल्‍यामुळे तो हवालदिल झाला आहे.

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. यामध्‍ये कापसाचे १ लाख २२ हजार ८६ तर साेयाबीनचे ८८ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. काही ठिकाणी पाणी उपलब्‍ध असल्‍याने जवळपास १५ हजार ४० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्‍ये ८ हजार ८८५ हेक्‍टरवर कापूस, ८६८ हेक्‍टरवर सोयाबीन, ३८६ हेक्‍टरवर बाजरी, ३ हजार ३५ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली आहे. याशिवाय ८६० हेक्‍टर तूर, १५५ हेक्‍टर मूग तर ५८० हेक्‍टरवर उडीद या गळीतधान्‍य पिकांची पेरणी झालेली आहे. पेरणीसाठी प्रत्‍येक तालुक्‍यांत सरासरी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. मात्र सध्‍या तरी कर्जत तालुका वगळता पेरणीजोगा पाऊस कुठे दिसत नाही. त्‍यामुळे ५ लाख ६५ हजार हेक्‍टर क्षेत्र पेरणीअभावी ओस पडले असल्‍याचे जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT