नगर: जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, नगर अशा सात तालुक्यांत आतापर्यंत तुटीच्या पावसाची नोंद आहे. राहुरी तालुक्यात सर्वांत कमी २३.८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तुटीच्या पावसामुळे धरणांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांतील खरीप पिके धोक्यात आली आहेत.
जून महिन्यात ३९ टक्के तुटीचा पावसाची नोंद आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ५० टक्के तुटीचा पाऊस नोंदला गेला आहे. गेल्या ७२ दिवसांत जिल्हाभरात सरासरी २४२.६ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना सरासरी २४६.१ मिलिमीटर नोंद झाली.
सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असल्याचे म्हटले जाते. मात्र, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी व राहाता आदी सहा तालुक्यांचा सरासरी पाऊस ३५.२१ टक्के नोंद झाला आहे. उर्वरित तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आहे.
पारनेर, कर्जत,श्रीगोंदा,संगमनेर, कोपरगाव आदी तालुक्यांत सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक ११२ टक्के पावसाची नोंद आहे.
गेल्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७० टक्के नोंद होती. मात्र, मे महिन्यांत जिल्हाभरात २५ टक्के पावसाची नोंद झाली होती.
भूजलपातळी वाढलेली असल्यामुळे विहिरींची पाणीपातळी बरी होती. यावेळी एप्रिल, मे व जून हे तीनही महिन्यांत कडक उन्हाळा होता. त्यामुळे भूजलपातळी एक ते दीड मीटर खालावलेली आहे. अद्यापही अडीच महिन्यांत दमदार पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे नगर तालुक्यांसह सात तालुक्यांतील खरीप पिके धोक्यात आलेली आहेत.
पावसाची टक्केवारी
अकोले ११२.८, कोपरगाव ६५.१, संगमनेर ६१, पारनेर ६१.८, श्रीगोंदा ६४.७, कर्जत ६६.७, जामखेड ५०, शेवगाव ३६.५, पाथर्डी ३८, नेवासा ३७.७, राहुरी २३.८, श्रीरामपूर ३२.२, राहाता ४३.१.