राहुरी: व्याजाने दिलेल्या पैशाची पूर्ण परतफेड करूनही तब्बल दोन लाख रुपयांच्या व्याजाची मागणी करत दोन महिला सावकारांकडून शंकर होले यांना मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून शंकर होले यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे.
या प्रकरणी गणेश शंकर होले (वय 27, रा. सात्रळ, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे वडील शंकर बाबुराव होले (वय 52) यांनी वैयक्तिक कामासाठी आरोपी सविता ज्ञानेश्वर पोटे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. त्यानंतर शंकर होले यांनी वेळोवेळी व्याजासह पूर्ण रक्कम परत केली होती. तसेच गणेश होले व त्यांचे वडील यांनी गणेश आप्पासाहेब थोरात यांच्या पत्नीकडून हातउसने म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतले होते.
पैसे घेताना दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी दोन चेक देऊन उसनवार पावतीची नोटरी करण्यात आली होती. संबंधित रक्कम मुदतीत परत केल्यानंतरही आरोपी महिलांनी दिलेले कोरे चेक परत देण्यास नकार दिला. कोणताही आर्थिक व्यवहार शिल्लक नसतानाही दि. 31 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही सावकार महिला होले यांच्या घरी जाऊन पैशांची मागणी करत शिवीगाळ व दमदाटी करून निघून गेल्या. त्यानंतर दि. 3 जानेवारी रोजी वारंवार फोन करून पैशांचा तगादा लावण्यात आला.
या सततच्या मानसिक त्रासामुळे शंकर होले यांनी दि. 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी विषारी औषध प्राशन केले. त्यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी महिलांनी रुग्णालयात जाऊन आमचे नाव कोठेही घेऊ नका, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. उपचार सुरू असताना दि. 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता शंकर होले यांचे निधन झाले.
या घटनेनंतर मयत शंकर होले यांचे पुत्र गणेश शंकर होले यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सविता ज्ञानेश्वर पोटे (रा. पाटा जवळ, श्रीरामपूर) व गणेश आप्पासाहेब थोरात यांच्या पत्नी (रा. घुलेवाडी, संगमनेर) या दोन महिला सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.