Ahilyanagar Rabi Crop Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Rabi Crop: अहिल्यानगर जिल्ह्यात 1,022 गावांत रब्बी पिकांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा अधिक

पुरेशा पाण्यामुळे रब्बी हंगाम जोमात; अंतिम पैसेवारी 15 मार्च रोजी जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात 1 हजार 22 महसुली गावे असून, या सर्व गावांतील रब्बी पिकांची सुधारित पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. पिकांसाठी आवश्यक ते पाणी भरपूर असल्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम जोमात आहे. दरम्यान, अंतिम पैसेवारी 15 मार्च रोजी जाहीर होणार आहे.

जिल्ह्यात 1 हजार 609 महसुली गावे आहेत. त्यापैकी 587 गावे खरीप हंगामासाठी असून, यामध्ये अकोले व संगमनेर तालुक्यांतील सर्वच गावांचा समावेश आहे. 1 हजार 22 गावे रब्बी हंगामी आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरीप हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती खरीप पिके लागली नाहीत. यंदा रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने 4 लाख 49 हजार 668 हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले.

यंदा दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी होते. त्यामुळे रब्बी ज्वारी व इतर पिकांना पेरणीसाठी रानंच मोकळी नव्हती. त्यामुळे रब्बी ज्वारीस पेरणीस उशीर झाला. इतर गहू, हरबरा, मका आदी पिकांची पेरणी वेळेत झाली. रब्बी पिकांसाठी पाणी भरपूर असल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी उशीरा होऊनही शंभर टक्के नोंद झाली आहे. अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यास संबंधित गावांना शासनाकडून विविध सवलती जाहीर केल्या जातात.

जिल्ह्यातील 1 हजार 22 गावांतील नजर अंदाज पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा अधिक आली. 31 जानेवारीला रब्बी पिकांची सुधारित पैसेवारी अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केला. रब्बी हंगामातील 1 हजार 22 गावांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. यावरुन रब्बी पिके उत्तम असल्याचे सिध्द होत आहे. अंतिम पैसेवारी 15 मार्च रोजी जाहीर होणार आहे. सध्या गहू, हरबरा, मका आदी पिके जोमात आहेत. गव्हाला ओब्या आल्या असून, हरबरा घाटी अवस्थेत आहे.

भूजलपातळी सध्या चांगली असून, त्यामुळे विहिरींची पाणीपातळी टिकून आहे. त्यामुळे रब्बी हंगाम सध्या जोमात असून, अंतिम पैसेवारीदेखील 50 पैशांपेक्षा अधिक येण्याची शक्यता अधिक आहे.

तालुकानिहाय गावे

कोपरगाव 63, राहाता 37, श्रीरामपूर 54, राहुरी 79, नगर 116, नेवासा 114, पाथर्डी 57, शेवगाव 80, पारनेर 100, श्रीगोंदा 115, कर्जत 118, जामखेड 87.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT