Ahilyanagar Pulse Polio Campaign Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Pulse Polio Campaign: अहिल्यानगरमध्ये पल्स पोलिओ मोहीम; 28 जूनला 0 ते 5 वर्षांतील सर्व बालकांना डोस

महानगरपालिकेचे व्यापक नियोजन; शहरातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही

पुढारी वृत्तसेवा

नगर: राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत रविवारी (28 जून) सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. शहरातील एकही बालक पल्स पोलिओच्या डोसपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले असून शेवटच्या घटकातील बालकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त मेहर लहारे यांनी दिली.

राष्ट्रीय पल्स पोलिओ डोस मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकास्तरीय कृती दलाची नियोजन बैठक उपायुक्त मेहर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागांच्या समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शिक्षण अधिकारी पठाण, डॉ. दिलीप बागल, डॉ. वृषाली आरू, सुनील कटारिया, डॉ. उज्ज्वला शिरसाट, डॉ. रणजित सत्रे, डॉ. समीर होळकर, संजय गुगळे, प्रतिभा राऊत, सुमित जाधव, शिल्पा ठोंबरे आदी उपस्थित होते.

उपायुक्त मेहर लहारे म्हणाले, पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पल्स पोलिओचा डोस पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांच्या समन्वयातून प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलिओ बूथ, फिरती पथके आणि विशेष मोहिमांद्वारे लाभार्थी बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बैठकीत उपस्थित विविध विभागांच्या प्रतिनिधींनी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना मांडल्या. शहरातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य केंद्रे, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक संघटनांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

महापालिकेकडून पोलिओ बुथचे नियोजन

डॉ. सतीश राजुरकर म्हणाले, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व पोलिओ बूथचे नियोजन पूर्ण करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेवकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील एकही बालक पल्स पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये यासाठी विशेष भर दिला जाणार आहे. पालकांनी पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT