Land Survey Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Property Survey Issue: मालमत्ता सर्वेक्षणावर नगरसेवकांचा सवाल; पारदर्शकतेसाठी बैठक मागणी

स्थायी समितीत तडजोडींचा आरोप; नालेसफाई व पाणीपुरवठ्यावरही चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाबाबत कर्मचारी तडजोडी करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मालमत्ता सर्वेक्षणाचे काम पारदर्शकपणे होण्यासाठी नगरसेवक व संबंधित एजन्सी प्रतिनिधींबरोबर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात सभापती सुभाष लोंढे यांनी अधिकाऱ्यांना बैठक घेण्यासंदर्भात सूचना केल्या.

महापालिका स्थायी समितीचे सभापती लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्थायी समितीची सभा झाली. सभेला अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांच्यासह विभागप्रमुख व समिती सदस्य नगरसेवक निखील वारे, बाबासाहेब वाकळे, सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी अजेंड्यावरील 12 विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत नगरसेवक निखील वारे म्हणाले, नालेसफाईसाठी जितके तास मंजूर झाले आहेत तितके काम करा, सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी नाल्याचे प्रवाह बंद झाले आहेत. प्रथम ते प्रवाह मोकळे करा तसेच कुठे नालेसफाई सुरू आहे, याबाबत त्या भागातील नगरसेवकांना माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेकडे 97 चेंबर कामगार आहेत. बाह्य यंत्रणेमार्फत का कामे करता, असा प्रश्न यावेळी वारे यांनी उपस्थित केला. नालेसफाई करताना बंद गटारींची झाकणे उघडून ही सफाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नालेसफाईची नगरसेवकांना माहिती द्या: वारे

शहरात महापालिकेच्यावतीने नालेसफाई सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी ओढे-नाले बंद झालेले आहेत. प्रथम तेथील प्रवाह मोकळा करा आणि सफाईचे काम करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक निखिल वारे यांच्यासह नगरसेवकांनी केली. या मागणीला सभापती सुभाष लोंढे यांनीही पाठिंबा देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या कामांना स्थायी ग्रिन सिग्लन

बिशप लॉइड कॉलनीतील अंतर्गत रस्ता विकसित करणे, उड्डाणपूल भूसंपादन निधीअंतर्गत मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौकापर्यंत उड्डाणपुलाला रोलिंग करणे, विनायकनगरमधील मातोश्री उद्यान येथे मल्टीपर्पज हॉल बांधणे, बोल्हेगावमधील रेणुकानगर येथील बौद्धविहार मोकळी जागा विकसित करणे, ओढे - नाले नदीपात्र पावसाळी सफाईची ई-निविदा मंजूर करणे, बाह्य यंत्रणेमार्फत नाले सफाई आदी विषयांचा समावेश होता.

सध्या पाणी कपातीची गरज नाही

नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी पावसाचा अंदाज, संभाव्य पाणी कपात आणि शासनाच्या पत्राबाबत माहिती विचारली. यावर प्रभारी जलअभियंता गणेश गाडळकर यांनी माहिती दिली. सध्या धरणाची पाणी पातळी 1783 असून ती 1752 पर्यंत राहणे अपेक्षित आहे. त्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे. सध्या एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी कपातीचे कोणतेही नियोजन नाही, असे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यापर्यंत शहरासाठी पाणीसाठा राखीव असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT