Helmet Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Helmet Rule: अहिल्यानगर पोलिसांचा मोठा निर्णय; विना हेल्मेट कर्मचाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई

पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर ई-चलनाद्वारे कारवाई; 15 ते 20 कर्मचाऱ्यांना दंड

पुढारी वृत्तसेवा

नगर: कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरला असून, शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ई-चलनाद्वारे दंड आकारला.

शहर वाहतूक शाखेच्या दोन अंमलदारांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून विना हेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ई-चलन मशीनच्या सहाय्याने दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.

पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हेल्मेट सक्ती करण्याबाबत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्या आदेशाची कडक अंमलबजावणी पोलिस अधीक्षक कार्यालयापासून करण्यात आली.

विना हेल्मेट आढळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी अचानक पोलिस अधीक्षक कार्यालयात राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे 15 ते 20 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर सर्वत्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोणताही पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी शहरात, अन्य ठिकाणी दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करताना आढळल्यास त्याच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बाबासाहेब बोरसे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT