नगर: श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच गणेश मूर्तीला घरी घेऊन जाण्यासाठी महिलांची लगबग सुरु होती. त्यामुळे खरेदीसाठी शहरातील व उपनगरांतील बाजारापेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची वेळ पहाटेपासूनच सुरु होत असल्याने घरोघरी सकाळीच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा चंग अनेक कुटुंबांनी बांधला. त्यासाठी सकाळपासूनच खरेदीसाठी कल्याण रोड, माळीवाडा, चितळे रोड, प्रोफेसर चौकात, भिस्तबाग आदींसह विविध ठिकाणच्या गणेश मूर्तीच्या दुकानांत गर्दी होती.
तारकपूर येथील श्रीराम मित्र मंडळासह शहरातील काही गणेश मंडळाने रात्रीच मिरवणुकीने गणेश मूर्ती आणल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
नगर शहरातील 10 हजार घरात शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना
महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद देत नगर शहरातील 10 हजार घरात शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. माझी वंसुधरा अंतर्गत पर्यावरण दूत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून शेकडो शाळेतील हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेत बनविलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
महापालिकेच्या या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विश्वविक्रमासाठी नामांकन मिळाले आहे. उपक्रमात सहभागी वतीने सर्व शाळांचा गौरव महापालिका करणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव संकल्पना व उपक्रम शहरात राबविण्यात आले. पर्यावरण दूत डॉ.अमोल बागुल, बालाजी वल्लाळ, सतीश गुगळे तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हजारो विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेश मूर्ती कार्यशाळेतून बनवून घेतल्या. सहभागी शाळा, महाविद्यालय व सामाजिक संस्थांचा महानगरपालिकेच्या वतीने गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
संकल्पनेमुळे गणेशोत्सव निश्चितच पर्यावरणासाठी प्रेरक ठरणार आहे. शाडू मातीची मूर्ती वापरू या, नैसर्गिक रंगांचा वापर करू या, पीओपी आणि प्लास्टिक ला नाही म्हणू या, कृत्रिम विसर्जन टाक्यांचा उपयोग करू या.. या चतु:सूत्रीमुळे माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश व उद्दिष्टही सफल होणार आहे.- यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका.