

नगर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रतीक्षेत असले तरी या वर्षी मात्र तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण करण्यासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे. या वर्षीची प्रस्तावांची पडताळणी, तसेच संबंधित गुुरुजींची परीक्षाही पूर्ण झाली आहे. लवकरच मेरिटनुसार पुरस्कारार्थींची नावे निश्चित होणार आहेत. दि.5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी तिन्ही वर्षांतील एकूण 41 शिक्षक, 5 केंद्र प्रमुखांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. (Ahilyanagar Latest News)
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर वर्षी पात्र शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. मात्र 2022 नंतर मागील दोन वर्षे शिक्षक पुरस्कार जाहीर झाले, परंतु पुरस्कारांचा कार्यक्रम झालेला नव्हता. त्यामुळे या वर्षी तरी हा कार्यक्रम होईल का, याविषयी साशंकता होती. शिवाय शिक्षण विभाग मोठा असतानाही पुरस्कारासाठी तरतूद मात्र अत्यल्प असते. त्यामुळे कार्यक्रम कसा करायचा, हाही शिक्षण विभागासमोर प्रश्न असतो. यंदा मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात मागील दोन व यंदाच्या एक अशा तीनही वर्षांचे पुरस्कार एकत्रित व तेही थाटामाटात वितरित करण्याच्या हालचाली मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सुरू केल्या आहेत. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचीही वेळ घेतली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले.
चौदा तालुक्यांतून एक-एक आणि दोन केंद्रप्रमुख असे 16 पुरस्कार दिले जातात. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून तीन प्रस्ताव बोलावले जातात. यंदा शेवगाव तालुक्यातून एकही प्रस्ताव आलेला नव्हता. त्यामुळे इतर 13 तालुक्यातून तीन-तीन प्रमाणे 39 प्रस्ताव आले. यापैकी 125 गुणांपैकी जास्त गुण घेणार्या 13 गुरुजींची पुरस्कारासाठी निवड होणार आहे. केंद्रप्रमुख उत्तर आणि दक्षिण असे दोनच पुरस्कार असतात, या ठिकाणी दोनच प्रस्ताव आलेले आहेत.
पुरस्कारासाठी 100 गुणांची शाळा भेटी देऊन परीक्षा होते, यात मिशन आरंभ, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, वर्गाची गुणवत्ता तपासली जाते. शिक्षकांचे पाठ निरीक्षण घेतले जाते, इत्यादी प्रकारे 100 पैकी गुणदान केले जाते. तर 25 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. यामध्ये साहित्य संमलेनाचे अध्यक्ष कोण होते, पुस्तकांचे लेखक, शैक्षणिक व शासन निर्णयावर आधारित प्रश्न होते. वर्णनात्मक उत्तरांचेही काही प्रश्न होते. 25 गुणांपैकी काही शिक्षकांना पाच ते जास्तीत जास्त 15 गुण पडल्याचे समजले. लेखी परीक्षेत गुरुजी काठावर पास आहेत. विशेष म्हणजे 39 पैकी 31 गुरुजींनीच ही परीक्षा दिली, तर आठ जणांनी दांडी मारल्याचे दिसले.
2023 ः नरेंद्र राठोड, सोमनाथ घुले, सचिन आढांगळे, भारती देशमुख, सविता साळुंके, अनिल कल्हापुरे, सुनीता निकम, अंजली चव्हाण, भागिनाथ बडे, एकनाथ चव्हाण, किरण मुळे, जाविद सय्यद, विजय गुंजाळ, साधना क्षीरसागर तसेच केंद्रप्रमुख रावजी केसकर, अशोक विटनोर. 2024- पुष्पा लांडे, संजय कडलग, पिंताबर पाटील, ललिता पवार, योगेश राणे, सुनील लोंढे, सुनील आडसूळ, गोरक्षनाथ बर्डे, नामदेव घायतडक, बाळू जरांडे, दीपक कारंजकर, स्वाती काळे, प्रकाश नांगरे, वर्षा कचरे तसेच केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर जाधव..
जिल्ह्यातून 39 शिक्षक व दोन केंद्र प्रमुखांची गुणानिहाय यादी नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. सप्टेंबरच्या 3 तारखेपर्यंत ही यादी अंतिम होणार आहे. त्यानंतर पुरस्कारांची घोषणा केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.