

टाकळीभान: महिला सक्षमीकरणासाठी शासनासह प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. गेल्या वर्षी महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,’ चा श्रीगणेशा केला. योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली. तेव्हापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे, मात्र गेल्या 25 जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही. यामुळे अशा अनेक लाडक्या बहिणींनी नाराजीचा सूर आळविला आहे.
याबाबत माहिती जाणून घेतली असता, कुटुंबात, आईसह दोन मुलींना या योजनेचा आर्थिक लाभ मिळत होता. कुटुंबातील आई व मुलीसह सुनेलाही लाभ मिळत होता. सासू व सुनेला लाभ मिळत होता, परंतू अचानक या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून रक्कम मिळाली नाही. (Latest Ahilyanagar News)
आत्तापर्यंत या योजनस पात्र लाभार्थी महिलांना एकूण 13 हप्ते मिळाले आहेत. जुलै महिन्याचा 13 वा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे, मात्र अनेक बहिणींना जून महिन्यापासून मेसेज आला नाही. रक्कम बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे अशा लाडक्या बहिणी रक्कम का येत नाही, या विवंचने अक्षरशः त्रस्त झाल्या आहेत.
राज्य सरकारकडून महिन्याच्या शेवटी किंवा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते, मात्र गेल्या तीन-चार हप्त्यांपासून हप्ता लांबणीवर पडत आहे. जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये, तर जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये जमा झाला. यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
फक्त उडवा- उडवीच्या उत्तरांनी बहिणी त्रस्त
अपात्र लाडक्या बहिणींची यादी अंगणवाडी सेविंकाकडे आली आहे, मात्र अंगणवाडी सेविका फक्त यादी पाहून, यादीत नाव आहे किंवा नाही, एवढेच सांगून, पंचायत समितीमध्ये महिला बाल विकास विभागाकडे अधिक चौकशी करा, असा सल्ला देतात. लाभार्थी बहिणी पंचायत समितीमध्ये गेल्यास त्यांना, ‘अंगणवाडी सेविकांना भेटा,’ सल्ला देवून उडवा- उडवीची उत्तरे दिली जात आहेत. नेमकं या लाडक्या बहिणींना रक्कम मिळणे का बंद झाले, याबाबत अपेक्षीत उत्तर न मिळल्यामुळे ऐण सणासुुदिच्या दिवसात या लाडक्या बहिणी त्रस्त व नाराज झाल्या आहे. रक्कम येण्याची त्या वाट पहात आहेत.