Nivruttinath Dnyaneshwari Palkhi Bandhubhet Pudhari
अहिल्यानगर

Nivruttinath Dnyaneshwari Palkhi Bandhubhet: अहिल्यानगरीत ‘बंधूभेटी’चा अविस्मरणीय क्षण; निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वरी पालख्या एकत्र, विठ्ठलनामाचा गजर

मार्केटयार्डमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यात भाविकांचा जल्लोष; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण, पुष्पवृष्टीने सोहळा दुमदुमला

पुढारी वृत्तसेवा

नगर: मार्केटयार्ड येथे रविवारी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यावर हभप गोसावी महाराज यांचे कीर्तन झाले. या भावनिक कीर्तनातून त्यांनी समाधी सोहळ्याच्या केलेल्या वर्णनामुळे उपस्थित हजारो भाविक भावुक झाले. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी करत हा समाधी सोहळा भक्तिभावाने साजरा केला.

दरम्‍यान, दुपारी ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पालखी सोहळ्याचे अहिल्‍यानगरीत आगमन झाले. सायंकाळी श्री ज्ञानेश्‍वरी पालखी मार्केट यार्ड येथे दाखल झाली. दोन्ही पालखीची भेट झाली तो क्षण अतिशय अविसमरणीय ठरला. या दोन्‍ही बंधूभेटीचा आनंद वारकर्‍यांनी घेतला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीचे शनिवारी (दि.११) शहरात भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. ही दिंडी काल मार्केटयार्ड येथे मुक्‍कामी राहिली. रविवारी सकाळी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त व मंदिराचे पुजारी जयंत गोसावी महाराज यांचे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यावर कीर्तन झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, हमाल पंचायत अध्यक्ष अविनाश घुले आदी उपस्थित होते.

या दिंडीच्या नगरमधील मुक्कामामुळे नगरकरांना वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांचे भव्य मंदिराची उभारणी होत आहे. हिंदू संस्कृती व मंदिरे जपलीच पाहिजे. यासाठी या मंदिराला माझ्यासह सर्व नगरकरांच्‍या वतीने मदत केली जाईल असे आश्‍वासन दिले. या दिंडी सोहळ्यामुळे शहरात भक्तिमय वातावरणासह वेगळी उर्जा निर्माण होत असल्‍याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. या सोहळ्यानंतर हमाल पंचायतच्या वतीने वारकर्‍यांना आमटी, भाकरी आदींचा प्रसाद देण्यात आला. नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पालखी सोहळा शनिवारी (दि.११) धनगरवाडी येथे मुक्‍कामी होते. रविवारी या दिंडीने अहिल्‍यानगरीकडे प्रस्‍थान केले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठुरायाच्या जयघोषात दिंडीचे अहिल्‍यानगरीत आगमन झाले. त्‍यामुळे दुसर्‍या दिवशीही शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

मिस्‍कीन मळा येथील गंगा उद्यान शेजारील ग्राऊंडवर दुपारी वारकर्‍यांना भोजनाचा स्‍वाद घेतला. त्‍यानंतर सायंकाळी दिंडीने मार्केटयार्डकडे प्रस्‍थान केले. शहरातील रस्‍त्‍यावर या पालखी दिंडीचे ठिकठिकाणी स्‍वागत झाले. मार्केटयार्ड येथे दिंडी पोहचताच संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी आणि संत ज्ञानेश्‍वरी हे दोन्‍ही पालखी सोहळे एकत्रित आल्‍याने या ठिकाणी विठ्ठलनामाचा एकच गजर झाला. या बंधूभेटीचा सोहळा मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. यावेळी दर्शनासाठी नगरकरांनी गर्दी केली होती. त्‍यानंतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पालखी सोहळा वाडिया पार्क येथे मुक्‍कामी रवाना झाला. या पालखीला कोणत्‍या प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्‍या वतीने रस्‍ता मार्ग मोकळा केला जात होता.

दोन्‍ही पालख्या-दिंड्यांचा मुक्‍काम अहिल्‍यानगरीत

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा दिंडी रविवारी दुसर्‍या दिवशीही नगरला मुक्‍कामी होती. ग्रंथराज श्री ज्ञानेश्‍वरी पालखी सोहळा दिंडीदेखील आज वाडिया पार्क येथे मुक्‍कामी थांबली. अहिल्‍यानगरीत या दोन्‍ही दिंड्या मुक्‍कामी असल्‍यामुळे शहर विठ्ठलमय झाले होते. महापालिका, स्‍वयंसेवी संस्‍था आणि व्‍यापारी मंडळांनी वारकर्‍यांसाठी विविध सुविधा उपलब्‍ध केल्‍या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT