Water Pipeline Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Water Supply: अहिल्यानगरमध्ये नव्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या परवानग्यांना स्थगिती

‘अल-निनो’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय; नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांतील प्रस्ताव पुढील आदेशापर्यंत थांबवले

पुढारी वृत्तसेवा

नगर: 'अल-निनो'च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली पाणीटंचाईची शक्यता व महापालिकेची अपुरी जलसाठवण व वितरण व्यवस्था पाहता अहिल्यानगरमधील नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये नागरिकांना स्वखर्चाने पाईपलाईन टाकण्यासंदर्भातील परवानगीची प्रकरणे पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून तसे अधिकृत कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहे.

सध्या 'अल-निनो'च्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने व प्राधान्यक्रमाने नियोजन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तसेच आगामी वर्षातही संभाव्य 'अल-निनो' समुद्र प्रवाह सक्रियतेचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा वापर नियोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेची सध्याची पाणी वितरण व्यवस्था आणि साठवण क्षमता अपुरी आहे, अशा स्थितीत नव्याने पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्यास अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊन पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या परिस्थितीचा सांगोपांग विचार करून, पुढील आदेश होईपर्यंत नव्याने विकसित होणाऱ्या भागात स्वखर्चाने पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या परवानगीची सर्व प्रकरणे स्थगित ठेवण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभाग प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT