डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी व रखडलेली थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान देण्यासाठी आठ कोटींची गरज असल्यारने चारही झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना महिनाभरात ११ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट (टार्गेट) दिले आहे. कुचराई कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स), पाणीपट्टी, आणि इतर विविध परवान्यांच्या थकीत रकमेची वसुली संथ गतीने सुरू असल्याबद्दल आयुक्त यशवंत डांगे यांनी चिंता व्यक्त केली. विकासकामांना गती देण्यासाठी व आर्थिक शिस्त लावण्यासाठी ही विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातच दिवाळी तोंडावर आल्याने देणी देणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नुकतीच चारही प्रभाग समिती कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. परंतु, दरवर्षीच्या यंदा कमी वसुली झाली आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. दिवाळी तोंडावर आली असून, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, सानुग्रह अनुदान देणे आहे. तर, महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे चार हप्ते थकले आहेत. महापालिकेला एका महिन्यात जवळपास आठ कोटींचे देणे आहे.
वसुली कर्मचाऱ्यांना दिलेल्या टार्गेटचा दररोज सायंकाळी आढावा घेतला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या शहरात मतदार यादी विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम सुरू आहे. महापालिकेचे कर वसुलीसाठी काम करणारे अनेक कर्मचारी एसआयआरचे काम करीत आहेत. एसआयआरच्या सुनावण्याला हजर रहावे लागत आहे. त्यामुळे एसआयआरच्या कामामुळे वसुलीला ब्रेक लागत आहे.
जप्ती, नळजोडणी तोडा पण वसुली आणा
आयुक्त यशवंत डांगे यांनी चारही झोन कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांना टार्गेट दिले आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करा, नळ कनेक्शन कट करा अशा सक्त सूचना देण्यात आले आहेत. वसुलीचे टार्गेट साध्य न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
अडीच हजार मालकत्ताधारकांना नोटिसा
एक लाखाच्या पुढे थकबाकी असणाऱ्या सुमारे अडीच हजार मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. थकीत कर भरा अन्यथा जप्तीची कारवाई अथवा नळ कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्यापि, एक ही मालमत्ताधारकाने नोटिसाला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
वार्ड ९०, वसुली कर्मचारी ५०
महापालिकेचे ९० वसुली वार्ड आहेत. प्रत्येक वार्डला वसुलीसाठी कर्मचारी नाही. एक कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन वार्ड वसुली आहेत. त्यामुळे वसुली संथगतीने सुरू आहे. ९० वार्डतील वसुलीसाठी अवघे ४५ ते ५० कर्मचारी आहेत.
२६१ कोटींच्या थकबाकीचा डोंगर
मागील थकबाकी धरून महापालिकेली २६१ कोटींची थकबाकी आहे. यंदाची मागणी ७० कोटींची होती. आतपर्यंत नऊ महिन्यात अवघे २४ कोटी वसूल झाले असून, ४६ कोटी २४ लाखांची थकबाकी आहे.
झोन निहाय वसुली टार्गेट
झोन १ - ५० लाख
झोन २ - ३० लाख
झोन ३ - २० लाख
झोन ४ - ४० लाख
शहरातील मालमत्ता
निवासी मालमत्ता - ८८३१०
अनिवासी मालमत्ता - १६५२४
मोकळ्या जागा - ३३४०७
नळ कनेक्शन - ५९१७२
महापालिकेला मूलभूत सुविधा देण्यासाठी निधीची अडचण भासत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिवाळी बोनस, पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी निधी शिल्लक नाही. त्यामुळे थकीत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर व पाणी पट्टी भरून सहकार्य करावे.यशवंत डांगे, आयुक्त महापालिका