Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Standing Committee: अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी व महिला-बालकल्याण समिती सदस्यांची विशेष सभेत निवड

पक्षीय संख्याबळानुसार 16-16 सदस्यांची नियुक्ती; सभापती-उपसभापती निवडीसाठी लवकरच प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य, तसेच स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडी विशेष सभेत केल्या जाणार आहेत. दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.

महापालिकेच्या विशेष सभेत संबंधित पक्षांच्या गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावांची शिफारस करण्यात येणार आहे. एकूण सदस्य संख्या व समितीची सदस्य संख्या या आधारावर 4.25 एवढे मूल्यांकन असणार आहे. त्यानुसार राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 27, भारतीय जनता पक्षाचे 25, शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 2, एमआयएमचे 2, बसपा 1 व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 असे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या आधारावर स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भारतीय जनता पक्षाचे 6, शिवसेनेचे 2, तसेच काँग्रेस व एमआयएमचा प्रत्येकी 1 सदस्य नियुक्त होणार आहे.

महिला व बालकल्याण समितीमध्येही असेच संख्याबळ असेल. महापालिकेच्या सदस्य निवडीच्या विशेष सभेत संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून सदस्यांच्या नावांची शिफारस केली जाईल व त्यानुसार नियुक्त्या केल्या जातील.

सदस्य निवडीनंतर सभापती निवड

स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समितीचे सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. विभागीय आयुक्तांकडून निवडणुकीसाठी सभेची तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक पार पडणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT