नगर: महापालिका महापौर व उपमहापौर निवडीचा विभागीय आयुक्तांनी कार्यकाळ निश्चित केला आहे. महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शोकसागरात आहे. त्यामुळे महापौर पदासाठी 2 फेबु्रवारीला अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अहिल्यानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युती करून निवडणुकीला सामोरे गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला 27 तर, भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विभागीय आयुक्त कार्यालयात जावून पक्षाची गट नोंदणी केली असून, नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. तर, भाजपच्याही नगरसेवकांनी गट नोंदणी केली असून, नगरसेविका शारदा ढवण यांची गटनेते पदी निवड केली आहे.
दरम्यान, राज्याच्या नगरसचिव विभागाने 30 ते 31 जानेवारीला महापौर निवडीचा कार्यक्रम निश्चित केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यात 29, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला महापौर पदासाठी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत दिली आहे. आज पहिल्या दिवशी कोणीही अर्ज घेतला नाही आणि अर्ज भरलाही नाही. त्यामुळे पहिला दिवस निरंक गेला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शोकसागरात आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस महापौर पदाच्या निवडीसंदर्भात कोणत्याही हालचाली होण्याची शक्यता नाही. 2 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी इच्छुक अर्ज भरण्याची शक्यता आहे.