Ahilyanagar Municipal Employees Protest Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Employees Protest: दिवाळी अग्रीम अन् १३० कोटींच्या थकीत देण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ; सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू, महापालिकेचे कामकाज ठप्प

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी सण अग्रीम तसेच सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत देणी तातडीने अदा करावीत, या मागणीसाठी महापालिका कामगार युनियनच्या वतीने सोमवार (दि. २३) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्यामुळे महापालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले. दरम्यान, यापूर्वी युनियनचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासोबर झालेली बैठकही निष्पळ ठरली.

महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी विविध मागण्यसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनावेळी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष नंदकुमार नेमाने, महादेव कोतकर, अजय सौदे, उपाध्यक्ष अमोल लहारे, सतीश ताठे, बैजू साठे, बाळासाहेब व्यापारी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच महानगरपालिकांमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी सण अग्रीम दिले जाते. मात्र, अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा दिवाळी सण होऊनही कर्मचाऱ्यांना अद्यापि सण अग्रीम देण्यात आलेले नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांची सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

महापालिकेचे कर्मचारी नियमित कामकाजाबरोबरच जनगणना, एसआयआर व निवडणुकीसारखी अतिरिक्त जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. महापालिका निवडणूक प्रक्रियेतही कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, निवडणुकीच्या कामाचा मोबदला अद्याप महापालिका कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. दुसरीकडे, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीतील कामाचा मोबदला महापालिकेने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला. राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर प्राप्त होत नसल्यास कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. एकीकडे कर्मचारी नियमित कामकाजासह अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या हक्काची देणी आणि सण अग्रीम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना युनियनने व्यक्त केली.

कामगार युनियनचे सचिव आनंदराव वायकर म्हणाले की, महापालिका कर्मचारी नियमित कामकाजासोबतच जनगणना, एसआयआर आणि निवडणुकीची अतिरिक्त कामेही कर्मचारी करतात. मात्र, त्यांच्या हक्काची थकीत देणी आणि दिवाळी सण अग्रीम अद्याप मिळालेले नाही. महापालिकेत काही जण तुपाशी आणि कर्मचारी उपाशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

महापालिका कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. हक्काची देणी आणि सण अग्रीमच्या मागणीसाठी आयक्तांशी चर्चा झाली. परंतु, त्यात तोडगा न निघाल्याने जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.
बाबासाहेब मुदगल, अध्यक्ष, कर्मचारी युनियन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT