मातब्बरांना पराभवाचा धक्का
भाजपचे माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे पुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांचा प्रभाग 11 मधून धक्कादायक पराभव झाला. विजयी सुनीता गेणप्पा यांना 4508 मते मिळाली तर, दीप्ती गांधी यांना 4406 मते मिळाली. गांधी यांचा अवघा 102 मतांनी पराभव झाला. प्रभाग दहामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव व पत्नी अश्विनी जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग 15 मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. तर, सुवर्णा दत्ता जाधव यांनाही पराभवाला समोरे जावे लागले. केडगावमध्ये शिवसेनेचे नेते दिलीप सातपुते यांचे पुत्र ओंकार सातपुते यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पहावा लागला. प्रभाग नऊ व पाच मध्ये उमेदवारी करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण व शीला दीप चव्हाण यांना दोघांचाही धक्कादायक पराभव झाला.
फेरमतमोजणीत नवनाथ कातोरे विजयी
प्रभाग 8 क मध्ये शिवसेनेचे नवनाथ कातोरे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबासाहेब नागरगोजे असा सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत कातोरे यांनी बाजी मारली. नवनाथ कातोरे यांना 6739 मते मिळाली तर, बाबासाहेब नागरगोजे यांना 6695 मते मिळाली. नवनाथ कातोरे यांना अवघ्या 44 मतांनी विजयी घोषीत केले. मात्र, बाबासाहेब नागरगोजे यांच्या प्रतिनिंधीनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी ग्राह्य धरून फेरमतमोजणी केली. त्या मतमोजणीतही कातोरे आणि बाबासाहेब नागरगोजे यांच्यामध्ये 44 फरक होता. नागरगोजे यांच्या प्रतिनिधींनी कांगावा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व मागण्या फेटाळू लावत नवनाथ कातोरे यांना विजयी केले. दरम्यान, प्रभाग 11 मधून शिवसेनेच्या वैष्णवी मैड व भाजपच्या दीप्ती गांधी यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. तर, प्रभाग 15 मधून शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांच्या प्रतिनिंधींही फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
बोल्हेगावात कास्ट फॅक्टर
प्रभाग 8 मध्ये चारपैकी कुमारसिंह वाकळे बिनविरोध विजयी झाले. प्रभाग 8 क मध्ये नवनाथ कातोरे आणि बाबासाहेब नागरगोजे यांच्या समोरासमोर लढत झाली. ही लढत शेवटपर्यंत अटीतटीची होती. कातोरे हे स्थानिक उमेदवार तर, नागरगोजे हे बाहेरील उमेदवार आहेत, असा प्रचार शेवटच्या टप्प्यात झाला. तर, दुसऱ्या बाजूला मराठा-ओबीसी असाही छुपा प्रचार झाल्याची चर्चा प्रभागात आहे.
अटीतटीच्या लढतीत दिग्गज घरी
प्रभाग 15 मधून ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांचे चिरंजीव सुजय मोहित विजयी झाले. अनिल शिंदे यांना 5125 मते मिळाली तर, सुजय माहिते यांना 5239 मते मिळाली. मोहिते यांचा अवघा 114 मतांनी विजय झाला. प्रभाग 8 क मध्ये नवनाथ कातोरे विरुद्ध बाबासाहेब नागरगोजे असा सामना झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत नवनाथ कातोरे यांचा अवघा 44 मतांनी विजय झाला. नवनाथ कातोरे यांना 6739 मते मिळाली तर, बाबासाहेब नागरगोजे यांना 6695 मते मिळाली. प्रभाग 4 ड मध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला. ज्येष्ठ माजी नगरसेवक समद खान यांचा अवघा 135 मतांनी पराभव झाला. समद खान यांना 6158 मते मिळाली तर, विजयी शम्स खान यांना 6293 मते मिळाली. प्रभाग 11 मध्ये शिवसेनेच्या सुनीता गेणप्पा आणि भाजपच्या दीप्ती गांधी यांच्या अटीतटीची लढत झाली. सुनीता गेणप्पा यांना 4508 मते मिळाली तर, दीप्ती गांधी यांना 4406 मते मिळाली. गांधी यांचा अनपेक्षित 102 मतांनी पराभव झाला.
मुरब्बी कारभाऱ्यांनी राखले गड
प्रभाग सात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल विजयी झाला. प्रभाग 13 व 14 हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. तिथे पुन्हा राष्ट्रवादीचाच करिश्मा दिसून आला. स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले आणि गणेश भोसले यांचे नेतृत्व पुन्हा सिद्ध झाले. तर, प्रभाग 12 मध्ये शिवसेनेचा जलवा चालला.
क्रॉस वोटिंग फिव्हरचे पराभव
प्रभाग एकमध्ये मतदारांनी क्रॉस वोटिंग करीत तीन मते राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर एक मत भाजपला दिले. त्यामुळे भाजपच्या शारदा ढवण विजयी झाल्या. प्रभाग तीनमध्येही क्रॉस वोटिंग पहायला मिळाले. मतदारांनी राष्ट्रवादी दोन तर एक भाजप असे वोटिंग करीत एक मत शिवसेना उबाठाला दिले. त्यामुळे क्रॉस वोटिंगच्या फेरीत योगीराज गाडे विजयी झाले. तर, भाजपच्या उषा नलावडे पराभूत झाल्या. प्रभाग चारमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने दोन काँग्रेस व दोन एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. त्यात ज्येष्ठ नगरसेवक समद खान यांना पराभव स्वीकारा लागला. प्रभाग नऊमध्ये क्रॉस वोटिंचा जलवा दिसला. भाजपचे महेश लोंढे क्रॉस वोटिंगचे धनी ठरले अन् विजयी झाले. त्यांनी माजी नगरसेवक सचिन शिंदे यांचा पराभव केला. प्रभाग दहामध्ये क्रॉस वोटिंगचा भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसला. मतदारांनी भाजप, शिवसेनेच्या उमेदवारांना बाजूला सारत क्रॉस वोटिंग केले आणि बसपाच्या श्रीपाद छिंदम यांना विजयी केले. त्यामुळे शिवसेनेचे सचिन जाधव, भाजपाचे महेंद्र बिज्जा, बसपाचे मुद्दसर शेख यांचा पराभव झाला. प्रभाग 11 मध्ये क्रॉस वोटिंगलाच मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते. प्रभागात दोन शिवसेना, प्रत्येक एक राष्ट्रवादी भाजपचा उमेदवार विजयी झाला.
चर्चेतील चेहऱ्यांनी गाजविले मैदान
प्रभाग एकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्याकडे सावेडी उपनगरातील लोकप्रिय चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली. त्याचबरोबर कुमारसिंह वाकळे, डॉ. सागर बोरूडे निखील वारे, संध्या पवार, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्योती गाडे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, अविनाश घुले, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, मनोज कोतकर यांनीही बाजी मारली असून, विरोधकांना चित केले.
पराभव अनपेक्षित
प्रभाग एक ब मध्ये मैत्रिपूर्ण लढत झाली. या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती सतीश ढवण यांच्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती. तिथे राष्ट्रवादीच्या ज्योती ढवण यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. प्रभाग तीनमध्ये भाजपाच्या उषा नलावडे व शिवसेना उबाठा गटाचे योगीराज गाडे यांच्या लढत झाली. त्यात उषा नलावडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग 8 मध्ये बाबासाहेब नागरगोजे यांचा निसटता पराभव झाला. प्रभाग 10 मध्ये महेंद्र बिज्जा यांची उमेदवारी भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. ॲड. धनंजय जाधव यांचा पारंपरिक प्रभाग असतानाही त्यांनी ती जागा बिज्जा यांच्यासाठी सोडली आणि दुसरा प्रभाग निवडला. मात्र, तिथे श्रीपाद छिंदम यांच्याकडून बिज्जा यांचा पराभव झाला. प्रभाग 11 मध्ये विकास वाघ व दीप्ती गांधी यांचा पराभव भाजपला आत्मपरिक्षण करायला लावणार आहे.
नवख्यांना संधी
रोशनी भोसले, गौरी अजिंक्य बोरकर, ॲड. ऋगवेद गंधे, काजल भोसले, मोहीत पंजाबी, सुनीता कुलकर्णी, करण कराळे, वर्षा सानप, आशाबाई कातोरे, नवनाथ कातोरे, रुपाली दातरंगे, महेश लोंढे, शितल ढोणे, मयुरी सुशांत जाधव, सागर मुर्तडकर, सुरेश बनसोडे, सुजाता महेंद्र पडोळे, पोर्णिमा गव्हाळे, दत्तात्रय गाडळकर, सुजय मोहिते, वर्षा काकडे अशा नव्यांना मतदारांनी नगरसेवकपदाची संधी दिली.
‘नातेगोते’ निवडणुकीत फेल
शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव व त्यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांनी उमेदवारी केली. मात्र, त्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रभाग 9 मधून उमेदवारी केली तर, पत्नी शीला चव्हाण यांनी प्रभाग पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी केली. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. प्रभाग तीन ब, क मध्ये सख्या जाऊबाई असणाऱ्या निलम विपुल वाखुरे व स्वनजा विनय वाखुरे यांनी उमेदवारी करून निवडणुकीत जोरदार प्रचार केला. मात्र, त्यांना पराभव पहावा लागला.
दिग्गजांची महापालिकेत पुन्हा एंट्री
प्रभाग एकमधून डॉ. सागर बोरूडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, दिपाली बारस्कर, प्रभाग दोनमधून महेश तवले, संध्या पवार, निखील वारे, प्रभाग तीन योगीराज गाडे, ज्योती गाडे, प्रभाग चार मधून खान मिनाज जाफर, प्रभाग पाचमधून ॲड. धनंजय जाधव, प्रभाग सहा मधून मनोज दुलम, सोनाबाई शिंदे, प्रभाग सातमधून पुष्पा बोरूडे, वंदना ताठे, बाबासाहेब सोन्याबापू वाकळे, प्रभाग आठमधून कुमारसिंह वाकळे, प्रभाग 9 मधून संजय शेंडगे, प्रभाग दहामधून श्रीपाद छिंदम, प्रभाग 11 मधून गणेश कवडे, सुनीता गेणप्पा, सुभाष लोंढे, प्रभाग 12 मधून मंगल लोखंडे, सुरेखा कदम, बाळासाहेब बोराटे, दत्तात्रय कावरे, प्रभाग 13 मधून अविनाश घुले, प्रभाग 14 मधून प्रकार भागानगरे, मीना चोपडा, गणेश भोसले, प्रभाग 15 मधून गीतांजली काळे, प्रभाग 16 मधून विजय पठारे, ज्ञानेश्वर येवले, प्रभाग 17 मधून मनोज कोतकर यांना मतदारांनी पुन्हा नगरसेवकपदाची संधी दिली आहे.
कमी वयात जनसेवेची संधी
महापालिकेच्या रणमैदानातून सर्वात कमी वयाच्या दोन उमेदवारांनी बाजी मारली. ते दोन्ही चेहरे भाजपचे आहेत. प्रभाग तीनमधून भाजपाकडून निवडणूक लढविणारे ॲड. ऋगवेद गंधे (वय-26) आणि प्रभाग 15 मधून निवडणूक लढविणारे सुजय मोहिते (वय-25) विजयी झाले. दोघेही सर्वात कमी वयाचे आणि उच्चशिक्षित उमेदवार आहेत.