Stray Dogs  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Stray Dog Shelter: मोकाट श्‍वानांसाठी महापालिकेचा ‘शेल्टर’चा आधार; १०० श्‍वानांच्या निवाऱ्यासाठी अनुदान

पात्र संस्थांना प्रति श्‍वान अनुदान; खाद्य, उपचार, स्वच्छता व सुरक्षेची जबाबदारी संबंधित संस्थांची, ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील भटक्या व मोकाट श्‍वानांच्या समस्येवर मात करण्यासाठी आणि त्यांचा योग्य सांभाळ करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका हद्दीत अथवा हद्दीबाहेर १०० श्‍वानांच्या क्षमतेचे शेल्टर हाऊस उभारून त्यांचा सांभाळ करण्यासाठी नामांकित व पात्र संस्थांकडून निविदा (प्रस्ताव) मागविण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत सहभागी होणाऱ्या संस्थांना महापालिकेकडून प्रति श्‍वान अनुदान दिले जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि 'ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'च्या नियमानुसार ही शेल्टर हाऊस योजना राबवली जात आहे. इच्छुक संस्थांकडून वर्षांच्या कालावधीसाठी अटी व शर्तींच्या अधीन राहून हे काम दिले जाणार आहे.

श्‍वानप्रेमी, सामाजिक संस्था व इच्छुकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ३१ ऑगस्टपर्यंत कोंडवाडा विभाग, माळीवाडा महानगरपालिका कार्यालय, अहिल्यानगर' येथे जमा करायचे आहेत.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • क्षमता व जागा: एका शेल्टरमध्ये १०० भटक्या श्‍वानांना ठेवले जाईल. यासाठी ७० बाय ४० फूट जागेत पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक असून, ही जागा नागरी वस्तीपासून लांब असणे बंधनकारक आहे.

  • पात्रता निकष: 'ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'ची मान्यताप्राप्त नोंदणी प्रमाणपत्र, ३ वर्षांचे आर्थिक (फायनान्शियल) रिपोर्ट आणि अनुभवाचा दाखला असणाऱ्या संस्थाच यासाठी पात्र ठरतील.

  • अनुदान व देखभाल: महापालिकेकडून प्रतिश्‍वान दररोज लागणारा खर्च संस्थांना दिला जाईल. श्‍वानांचे खाद्य, वैद्यकीय उपचार, स्वच्छता, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी पूर्णपणे संबंधित संस्थेची असेल.

  • सीसीटीव्ही व ॲपचा वापर: शेल्टर हाऊसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असून, दैनंदिन कामकाजाची माहिती महापालिकेच्या मोबाईल ॲपद्वारे नोंदवणे बंधनकारक राहील.

  • नियंत्रण: या संपूर्ण प्रकल्पावर महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालय (कोंडवाडा विभाग) यांचे थेट नियंत्रण असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT