Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Corporation: प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव; मनपाच्या स्थायी समितीत आज निर्णय?

अहिल्यानगर महापालिकेच्या सभेत ३२ विषयांवर चर्चा; रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कोट्यवधींच्या कामांना मंजुरी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नाव कोरलेल्या स्व. प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्या (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा, आरोग्य व रस्ते कामांचे अजेंड्यावर असून, कोट्यवधींच्या विकासकामांवर होणार शिक्कामोर्तब होणार आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. १७) दुपारी महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या ३२ महत्त्वाच्या विषयांचा समावेश असून, शहरातील विविध प्रभागांतील कोट्यवधी रुपयांची रस्ते व गटार कामे, महिलांसाठी ओपन जीम, पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाच्या खरेदी प्रस्तावांवर या सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये मनपाचे प्रमोदजी महाजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सामाजिक किंवा शैक्षणिक संस्थेमार्फत चालविण्यास देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून 'स्वारस्य अभिव्यक्ती' प्रस्ताव मागविण्याबाबतचा महत्त्वाचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे.

नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना, महापौर शहर विकास निधी, विकास भार निधी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) आणि अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक प्रिमियम निधीतून शहरातील विविध प्रभागांत कोट्यवधींची कामे प्रस्तावित आहेत. ऐतिहासिक भिस्तबाग महाल सुशोभीकरण कामातील अतिरिक्त बाबींना मंजुरी देणे. अभियंता कॉलनीतील आदर्श शाळा परिसर व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, प्रोफेसर कॉलनी चौकात ३०० मि.मी. व्यासाची गटार लाईन टाकणे, सारसनगर व शांतिनगर भोसले आखाडा ते सीना नदीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व गटार करणे, भवानीनगर येथील जिजामाता उद्यान परिसरातील काही भाग निर्लेखित करणे, आनंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून जयभीम हौसिंग सोसायटीत समाजमंदिर बांधणे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम २०२३ चे काटेकोर पालन करण्याबाबतचा प्रस्ताव सभेपुढे येत आहे. याशिवाय नागरी हिवताप योजनेसाठी फॉगिंग मशीन्स, जंतुनाशके खरेदी आणि कै. बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासाठी औषध खरेदीच्या संविदांची माहिती सभागृहात सादर केली जाणार आहे. पाणीपुरवठा विभाग, घनकचरा व्यवस्थापन, कोंडवाडा विभाग आणि देशपांडे दवाखान्यातील कनिष्ठ अभियंता, परिचारिका, फिटर व इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनावरील नियुक्ती व मुदतवाढीचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

खासगी टँकरने पाणीपुरवठा

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरात आवश्यकतेनुसार जी.पी.एस. यंत्रणेसह खासगी टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करण्याच्या दरास मंजुरी देणे, तसेच पाणी शुद्धीकरणासाठी लिक्विड क्लोरीन गॅस आणि तुरटी (ॲॅलम) खरेदीच्या वार्षिक दरांना मंजुरी देणे विषयही अजेंड्यावर घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT