नगर: आषाढी वारी निमित्ताने अहिल्यानगर शहरात येणाऱ्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली आहे. संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्केट यार्डमध्ये मुक्काम असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी सोहळ्याचा वाडिया पार्कमध्ये मुक्कमा आहे. दोन्ही ठिकाणी वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महापालिका सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकैकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा तातडीने पुरविण्याचे आदेश दिले होते. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन योग्य रीतीने व्हावे म्हणून उपायुक्त मेहेर लहारे यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे शहरात शनिवारी (दि. ११) जुलै रोजी आगमन होणार आहे. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे यांचे दिंडी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. मार्केट यार्ड आणि क्लेराब्रूस शाळा येथे या पालखीचा मुक्काम असेल. त्यानंतर १३ जुलै रोजी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळ्याचे रविवारी (दि. १२) आगमन होणार असून वाडियापार्क (माळीवाडा) येथे पालखीचा मुक्काम असेल. ही पालखी १३ जुलै रोजी मार्गस्थ होणार आहे. दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय साहित्यासह वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणच्या हॉटेल्समधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी टँकरर्सद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजवून डागडुजी करण्यात आली आहे. मार्केट यार्डमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.
मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, स्नानगृहे उभारली असून, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र फिरते स्वच्छतागृह उभारण्यात आले. दोन मोबाईल टॉयलेट्स व सक्शन मशीन तैनात आली आहे. विद्युत विभाग पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अखंडित वीज पुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुक्कामाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने तैनात राहणार आहेत.