Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Budget Issues: 1738 कोटींच्या बजेटवरून नगर पालिकेत खडाजंगी; 300 कोटी थकबाकीवरून प्रशासनावर सवाल

कुत्र्यांचा प्रश्न, ओपन स्पेस आणि मिळकतींवरून नगरसेवक आक्रमक; सभा तहकूब

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेने 1738 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले मात्र, वसुली 300 कोटींच्या पुढे थकीत आहे. कुत्रे पकडण्यावर वारंवार खर्च करूनही कुत्र्यांची संख्या कमी होत नाही. रस्ते खोदाईचा दर प्रशासनाने का कमी केला? ओपन स्पेसच्या जागा मूळ मालकांच्या नावावर, मग प्रशासान नेमके करते तरी काय? असे अनेक सवाल उपस्थित करीत नगरसेवकांनी प्रशासनाला शुक्रवारी धारेवर धरले. दरम्यान, सभा तहकूब करण्यात आली असून, उद्या पुन्हा त्यावर चर्चा होणार आहे.

महापालिकेची 1738 कोटींच्या अंदाजपत्रकावर चर्चेसाठी शुक्रवारी महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त उतेकर, नगरसचिव मेहेर लहारे आदी उपस्थित होते. रस्ते खोदाईचे दर प्रशासनाने कमी कसे केले? स्थायी समितीत दर मंजुरी झाल्यानंतर ते कमी करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? महापालिका सर्वोच्च आहे. कोणीही सांगितले म्हणून दर कमी करणे नगरकरांच्या हिताचे नाही. ते दर पूर्वीप्रमाणे ठेवावेङ. सावेडीतील एससीसीची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. तेथे व्यापारी संकुल उभे करावे, अशी मागणी कुमार वाकळे, संपत बारस्कर, बाबासाहेब वाकळे, निखील वारे यांनी केली. दरम्यान, सर्वच नगरसेवकांनी कर आकारणीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळकती धूळखात पडून

महापालिकेचा 300 कोटींची थकबाकी असून, त्यासाठी वसुलीसाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या, असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी सभेच्या सुरुवातीला उपस्थित केला. उत्पन्नवाढीसाठी नवीन स्रेोत काय निर्माण केले. महापालिकेच्या कोट्यवधींचा मिळकती धूळखात पडून आहेत. त्यावर आयुक्तांनी वसुलीसाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील आणि उत्पन्नाचे स्रेोत वाढविण्यावर भर दिला. पाणीपट्टी वाढविल्यानंतर मनपाच्या तिजोरीत भर पडणार असल्याचे सांगितले.

ओपन स्पेसवर महापालिकेचे नाव

महापालिकेच्या प्रभाग तीनमधील ओपन स्पेसवर 35 वर्षांनंतरही मूळ मालकाचे नाव आहे. व्यंकटेशन कॉलनी येथील भूखंड मूळ मालकाने विक्री केल्याचा आरोप नगरसेवक वारे यांनी केला. त्यावर विभागाच्या सहायक संचालक स्नेहल यादव आणि नगररचनाकार वैभव जोशी निरुत्तर झाले.

पिंपळगाव माळवीच्या जागेवर शेती

पिंपळगाव माळवी तलाव परिसरात महापालिकेची किती जागा आहे? ती महापालिकेच्या ताब्यात आहे का? असा प्रश्न नगरसेवक निखील वारे यांनी उपस्थित केला. त्यावर इंजिनीअर गाडळकर यांनी सांगितले की, सुमारे 700 एकर शेती असून, काही क्षेत्रावर विशिष्ट लोक शेती करीत आहेत, अशी गंभीर बाब सभागृहात स्पष्ट केली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत महापालिकेच्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

कुत्र्यांची संख्या कशी वाढते?

महापालिकेने बजेटमध्ये कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी सुमारे सव्वा कोटीची तरतूद केली आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करूनही शहरात कुत्र्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत माळीवाडा, स्टेशन रोड, बोल्हेगाव, केडगाव, पाईपलाईन रोड परिसरात अनेकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले, की पिंपळगाव माळवी येथे कुत्र्यांसाठी निवारा कक्ष उभारण्यात येणार आहे. तसेच निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांना टॅग लावण्यात येणार आहेत. या चर्चेत संपत बारस्कर, कुमार वाकळे, सागर बोरूडे, निखील वारे, मनोज कोतकर, सुरेखा कदम, गीतांजली काळे यांनी भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT