Money In Elections Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar MLC Election Candidates Assets: विधान परिषद निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? तनपुरेंची संपत्ती किती?

प्राजक्त तनपुरेंकडे 15 कोटींची मालमत्ता; पाचही उमेदवारांचे अर्ज वैध, 18 जूनला मतदानाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नगर: विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पानसरे यांची जंगम व स्थावर मालमत्ता 17 कोटी 6 लाख 37 हजार रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मालमत्ता 15 कोटी 34 लाख एवढी आहे.

पानसरे हे आर्थिकदृष्ट्या पाचही उमेदवारांत प्रबळ असल्याचे दिसत आहे. तनपुरे कोट्यधीश असले तरी त्यांच्या नावे एकही चारचाकी वाहन नसल्याचे विवरणपत्रातून दिसत आहे. भाजपचे प्राजक्त तनपुरे तसेच अपक्ष उमदवार करण ससाणे, दत्तात्रय पानसरे, कमलेश गांधी व मच्छिंद्र धुमाळ यांनी उमेदवारी अर्जासोबत आपापल्या संपत्तीचे विवरणपत्र शपथेवर निवडणूक आयोगाला सादर केले आहे.

अशी आहे त्यांची संपत्ती

तनपुरे पती-पत्नीची जंगम व स्थावर मिळून एकूण 15 कोटी 35 लाख रुपयांची मालमत्ता आहे. या कुटुंबावर बँक व इतर व्यक्तींचे मिळून 6 कोटी 63 लाखांचे कर्ज आहे. तनपुरे यांना वारसा हक्काची 9.33 एकर जमीन तर त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांना माहेरून 6.5 एकर जमीन उपलब्ध झालेली आहे. लोहगाव पुणे येथे त्यांचे 5 कोटी 30 लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट आहेत. या कुटुंबाकडे 3 कोटी 21 लाख रुपयांची वांबोरीत 306 चौरस मीटर जमीन आहे. या कुटुंबाकडे 25 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोने, तर सोनाली यांच्या नावे दहा लाखांची ज्वेलरी आहे. प्राजक्त शुगर व प्राजक्त टेक्स्टाइल या दोन्हीत जवळपास 93 लाखांचे शेअर्स आहेत.

पानसरे पती-पत्नींकडे 9 कोटी 18 लाख जंगम, तर 7 कोटी 88 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. एकूण संपत्तीपैकी जवळपास 13 कोटींची मालमत्ता पत्नी अर्चना पानसरे यांच्या नावे नोंद आहे. पत्नीच्या नावे 57 लाखांची दोन चारचाकी वाहने आहेत. उमेदवार पानसरे यांच्याकडे 85 ग्रॅम सोने, तर पत्नी अर्चना यांच्याकडे 90 ग्रॅम सोने आहे. केडगाव येथे पत्नीच्या नावावर एक हॉटेलदेखील आहे. या कुटुंबाची घारगाव, घोटवी, बेलवंडी, केडगाव आदी ठिकाणी शेतजमीन तसेच सावेडी, चाहुराणा येथे निवासी इमारती आहेत. या कुटुंबावर 3 कोटी 69 लाखांचे कर्ज देखील आहे.

इतरदेखील कोटीच्या घरात

उमेदवारी अर्जातील शपथपत्रानुसार माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांच्याकडे 1 कोटी 33 लाख 55 हजार रुपयांची मालमत्ता आहे. मच्छिंद्र धुमाळ यांच्या नावे 1 कोटी 6 लाखांची मालमत्ता असून, कुटुंबाकडे 70 ग्रॅम सोने आहे. कमलेश गांधी हेदेखील एक कोटीच्या मालमत्तेचे धनी असून, त्यांच्यावर साडेअकरा लाखांचे कर्ज आहे.

सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या पाचही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.2) वैध ठरविण्यात आले. आता अर्ज माघारीसाठी त्यांना गुरुवारपर्यंत (दि.4) मुदत देण्यात आली आहे. सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यास 18 जून रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात येणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT