Milk Adulteration Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Milk Collection: भेसळविरोधी कारवाईचा मोठा परिणाम? अहिल्यानगरमध्ये दररोज दोन लाख लिटर दूध संकलन घटले

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेनंतर धक्कादायक आकडेवारी; सावळीविहीर दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित, राहुरीतील डेअरी कारवाईही चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

नगर: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनांनुसार गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात प्रशासनाकडून दूध भेसळखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी याचा धसका घेतल्याची चर्चा आहे. कदाचित, याच कारणातून मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दररोज तब्बल दोन लाख लिटर दूध घटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आता कमी झालेले हे दूध भेसळीचे होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात डेअरी विभागाच्या माध्यमातून दर महिन्याला दररोजच्या दूध संकलनाचा अहवाल तयार केला जातो. जिल्ह्यात साधारणतः 153 सहकारी संस्थासह खासगी दूध संकलनाची आकडेवारी ही शासनाकडे पाठवली जाते. मे महिन्यात 48.32 लाख लिटर दररोज दूध संकलन सुरू होते. गत वर्षभरात जिल्ह्यात दररोज चार लाख लिटर दूध वाढल्याचे यातून पुढे आले होते. मात्र, मे महिन्यातच आयुक्त मुंडे यांनी दूध भेसळीवर कारवाई सुरू केली होती.

जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने उशीरा का होईना, पण कारवाईचे धाडस दाखवले. यातून अनेकांनी धसका घेतल्याचेही बोलले गेले. परिणामी, काल दि.10 रोजी डेअरी विभागाचा जून महिन्यातील अहवाल समोर आला. यात दररोज 46.81 लिटर दूध संकलन झाले. अर्थात दररोज सुमारे दोन लाख लिटर दूध कमी झाल्याचे ‘प्रशासकीय’ आकडेवारीतून दिसले. मात्र, प्रत्यक्षात ग्राऊंडवर जाऊन अहवाल घेतला तर हा आकडा पाच लाख लिटरपर्यंत घटलेला असू शकतो, असेही जाणकार सांगत आहेत.

सावळीविहीरमध्ये दूध केंद्रावर छापा

आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनांनुसार, नगरचे अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे व सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी सावळीविहिरच्या मे. साई जतिन दूध संकलन केंद्राची तपासणी केली. लूज गाय दूध (डम्प टँक, स्टोअरेज टँक) नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यात त्रुटी तसेच अन्न आस्थापनाने नाकारलेल्या पदार्थाचा अहवाल विचारात घेता हा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तत्काळ या पेढीचा परवाना निलंबित करण्यात आल्याचेही समजले.

राहुरीतील डेअरीचा परवाना निलंबित

आयुक्त मुंडे यांच्या आदेशाने सुरू झालेल्या कारवाईतून, दोन दिवसांपूर्वी राहुरीच्या पूर्व भागातील एका दूध डेअरीवर नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून, त्यांचा परवाना रद्द केला होता. मात्र, याविरोधात डेअरी चालकाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यात, न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT