नगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजराजनगर येथील बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 13 लाख 92 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असिफ खुदाबक्ष तांबोळी (वय 50, रा. मुकुंदनगर), जफर चाँद शेख (वय 38, रा. मुकुंदनगर), दाऊद बाबुमियाँ शेख (वय 42, रा. सदर बाजार भिंगार, ता. जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. दि. 18 एप्रिल 2026 रोजी पोलिस पथक अहिल्यानगर शहरामध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्याची माहिती काढत असताना माहिती मिळाली.
असिफ तांबोळी (रा. मुकुंदनगर) हा साथीदारांसह कालीमाता मंदिराजवळ, गजराजनगर येथे घरामध्ये साधी तंबाखू आणून त्यापासून बनावट सुगंधीत तंबाखू तयार करण्याचा कारखाना चालवित आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांना माहिती दिली.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह पथकाने गजराज नगर येथे छापा घालून बनावट सुगंधीत तंबाखू तयार करताना तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांच्याकडून बनावट सुगंधीत तंबाखूसह 13 लाख 92 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.