नगर: राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 अभियानांतर्गत घेतलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये पुरस्कार मिळाला आहे. 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला 5 कोटींचे तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच, मागील वर्षी माझी वसुंधरा 4.0 अभियानातही राज्यात 6 कोटींचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. या दोन्ही 11 कोटींच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व आयुक्त यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबई येथील कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माझी वसुंधरा अभियानात गेली दोन वर्षे महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करीत तिसरा क्रमांक मिळवला. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या.
शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही चांगली कामगिरी करू शकली, असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.
माझी वसुंधरा 6.0 या अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने तीन ते दहा लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व अधिकारी नियोजन करून उपाययोजनांमध्ये सुधारणा करत आहेत. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन महानगरपालिकेचा राज्यात नावलौकिक निर्माण होण्यासाठी सहकार्य करावे.ज्योती गाडे, महापौर
स्वच्छता हा केवळ सौंदर्यीकरण अथवा सुशोभीकरणाचा भाग नाही. स्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहिले तर शहराच्या विकासात नागरिकांचे योगदानही वाढते. या सर्व सकारात्मक बाबींतून शहराच्या प्रगतीला चालना मिळते. येत्या काळात सर्व नागरिकांना एकत्र आणून सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जातील.ॲड. धनंजय जाधव, उपमहापौर
अहिल्यानगर महानगरपालिकेने माजी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये 1.50 कोटी, 3.0 मध्ये 6.00 कोटी, 4.0 मध्ये 6.00 कोटी, 5.0 मध्ये 5 कोटी अशी 18.50 कोटी रुपयांची पारितोषिक महानगरपालिकेने मिळवली आहेत. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये हरित शपथ घेण्यामध्ये महापालिका राज्यात तीन ते दहा लक्ष लोकसंख्या गटामध्ये प्रथम स्थानी होती. महापालिकेला सक्षम व गतिमान बनवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.यशवंत डांगे, आयुक्त