नगर: आगामी महापालिकांच्या निवडणुकांच्या हालचाली राज्यस्तरावर सुरु झाल्या असून, सोमवारनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सात निवडणूक निर्णय अधिकारी व सहा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे आदेश जारी केले आहेत.
महापालिकेसाठी 17 प्रभाग असून, प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय आहे. निवडणुकीच्या माध्यमातून 68 नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रभागरचना, आरक्षण आणि मतदारयादी असे तीन घटक महत्त्वाचे असून, प्रभागरचना व आरक्षणाची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 3 लाख 9 हजार 7 मतदारसंख्या असलेली प्रारुप मतदारयादी प्रसिध्द झाली असून, 9 हजारांवर हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर सुनावणीचे काम सुरु आहे. 15 डिसेंबरला अहिल्यानगर महापालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.
निवडणुकीसाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. अहिल्यानगर महापालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिध्द होताच, येत्या आठ दिवसांत अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सात अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. तहसीलदार दर्जाच्या सहा तहसीलदारांची सहाय्यक निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती केली. सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपैकी एकाची आचारसंहिता कक्ष प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कालावधीतील खर्चाचा हिशेब तपासणीसाठी स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालयाचे सहय्यक संचालक रमेश कांतीलाल कासार यांची लेखा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार (सा.प्र.) नागेश गायकवाड, तहसीलदार (महसूल) शोभा पुजारी, तहसीलदार (भूसुधार) योगेश शिंदे, तहसीलदार (सगांयो) शीतल साळवे, तहसीलदार (पुनर्वसन) हिमालय घोरपडे, नगर तहसीलदार संजय शिंदे.
निवडणूक निर्णय अधिकारी
उपजिल्हाधिकारी रोहयो अनुपसिंग यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा राजेश बडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिवाजी पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.1) अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.14) सुभाष दळवी, नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.3) सायली अशोक सोळंके.