Ahilyanagar Municipal Corporation Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Mahapalika Controversy: महायुतीतील विसंवाद उघड; अहिल्यानगर महापालिकेची महासभा तहकूब

राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांची सभेकडे पाठ; कोरमअभावी महापौरांवर नामुष्की

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रवादी व भाजप महायुतीला बहुमताचे संख्या बळ मिळाले आणि दोन्ही पक्ष सत्तेत आले. परंतु, त्यांच्यातील विसंवाद शुक्रवारी महासभेच्या निमित्ताने समोर आला. महासभेवर दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी जणू बहिष्कारच टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शुक्रवारी (दि. 15) महासभा कोरमअभावी तहकूब करण्याची नामुष्की महापौर ज्योती गाडे यांच्यावर आली. दरम्यान, सत्ताधारी नगरसेवकांचीच विषयपत्रिका तयार करताना मनपा प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त करीत सभेकडे पाठ फिरविल्याचे सूत्रांकडून समजले.

महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी महासभा आयोजित करण्यात आली होती. त्यात बोल्हेगाव-पंपिंग स्टेशन-कल्याण रोड या 48 कोटी रुपये खर्चाच्या 30 मीटरच्या रिंग रोडसाठी भूसंपादन तसेच नेहरू मार्केट, रंगभवन, गंज बाजार व एनसीसी कार्यालयांच्या जागांवर व्यापारी संकुले व उपनगरांसाठी भुयारी गटार योजनेसाठी मिळून सुमारे 600 कोटींचे कर्ज घेण्याच्या विषयांसह एकूण 22 विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. दुपारी एकच्या या सभेसाठी सभागृहात केवळ महापौर ज्योती गाडे यांच्यासह शिवसेनेच्या वैशाली नळकांडे, सुनीता गेनाप्पा, सोनाली दातरंगे, नवनाथ कातोरे, शहाबाज सय्यद एवढेच नगरसेवक आणि आयुक्त यशवंत डांगे, नगरसचिव मेहेर लहारे उपस्थित होते. गणपूर्ती होत नसल्याने काही काळ सभा तहकूब करण्यात आली.

मात्र, अर्धा तास वाट पाहूनही कोणी सभेकडे न फिरकल्याने ही सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. सभेची पुढील तारीख व वेळही जाहीर केली नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा प्रशासनाला महासभा तहकूब करण्याची वेळ आली. मनपा प्रशासनाद्वारे विविध विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करणे व व्यापारी संकुलासाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावित विषयांवर नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. महापौर राष्ट्रवादीचा व उपमहापौर भाजपचा तरी प्रशासन नगरसेवकांना विश्वासात घेऊन विषय अजेंड्यावर घेत नसल्याची भावना नगरसेवकांमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगरसेवकांनी महासभेकडे पाठ फिरविल्याचे समजते.

त्या बैठकीचीही रंगली चर्चा

महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची तारकपूर परिसरातील एका हॉटेलवर बैठक झाल्याची चर्चा आहे. त्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची फोनवर चर्चा झाल्याचेही समजते. भूसंपादन व कर्ज हेे महत्त्वाचे विषय असताना त्याबाबत विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केल्याचे समजते.

आम्हाला निरोप आले अन्‌‍ संख्या कमी होती

महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला 27 व भाजपला 25 जागा देऊन स्पष्ट बहुमत दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्तेचा वारू चौखूर धावणार हे निश्चित होते. मात्र, लाभाचा तराजू कमी-जास्त होऊ लागल्याने या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आम्हाला साडेबारालाच सभा रद्द झाल्याचे फोन आल्याने आम्ही सभेला गेलो नाही, असे भाजप नगरसेवकांकडून सांगण्यात आले. तर, उपस्थितांची संख्या कमी असल्याने आम्ही गेलो नाही, असे राष्ट्रवादीवाले सांगतात. मात्र, लाभाचा वाद वेगळाच असल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे.

सार्वजनिक कामे आणि आज लग्नाची मोठी तिथी असल्याने नगरसेवक महासभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे महासभा तहकूब करावी लागली.
यशवंत डांगे, आयुक्त
मनपाची नियोजित सभा अचानक तहकूब झाली. पंपिंग स्टेशन, सावेडी ते कल्याण रोड - अमरधामपर्यंत 30 मीटर रुंदीच्या रिंग रोडकरिता बाधित होणाऱ्या जमिनीचे संपादन, केडगावच्या सर्वे नंबर 208 मधील जागेचे रस्त्यासाठी भूसंपादन, यापूर्वी निकृष्ट झालेल्या कामांच्या अनामत रकमा परत करणे, बँकांकडून शेकडो कोटींची कर्ज काढणे आदी विषय विषय पत्रिकेवर होते. 114 कोटींच्या कर्जावर उभारण्यात येणाऱ्या नियोजित पाच व्यापारी संकुलांतील गाळ्यांच्या वाटपाचा मलिदा कोणी किती खायचा यावरून राष्ट्रवादी - भाजप नगरसेवकांत तू तू - मै मै झाल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.
किरण काळे, शहरप्रमुख शिवसेना (उबाठा)
महापालिकेची सर्वसाधारण सभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी असते. पण आज पुन्हा एकदा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या गलथान, बेजबाबदार आणि संशयास्पद कारभारामुळे सभा तहकूब करण्याची वेळ आली आहे. विषय पत्रिकेतील क्रमांक 17, 20 व 22 हे विषय अत्यंत वादग्रस्त असून त्यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहारांचा व कर्ज प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामुळेच या विषयांवर पारदर्शक चर्चा होण्याऐवजी सभा तहकूब करण्यात आली, ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा मनमानी कारभार आम्ही सहन करणार नाही. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल. प्रत्येक प्रस्तावाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
दीप चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT