

शशिकांत पवार
नगर तालुका: नगर तालुक्यातील बारा गावांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. डोंगर उतारावरील विविध गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्या असून, बहुतांश जलस्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. 44 गावांसाठीच्या बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी आल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.
उष्णतेचा कहर सुरू असून, विविध गावांतील पाणीसाठा कोरडा पडल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना सहन करावा लागत आहे. दि. 10 एप्रिलपासून काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सध्या तालुक्यात बारा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, कोल्हेवाडी गावाचा टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. तसेच जेऊर परिसरातील वाड्या-वस्त्यांवरही तीव्र पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
गर्भगिरीच्या डोंगर उतारावर वसलेल्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांत पावसाच्या सुरुवातीलाच भूजल पातळी वाढते, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई जाणवू लागते.
इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी यांसह ठराविक गावांना दरवर्षी उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागते. इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या तीन गावांना 10 एप्रिलदरम्यान टँकर सुरू करण्यात आले आहेत.
अतिवृष्टी होऊनही काही गावांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. नद्या नाल्यांना महापूर आला. तलाव, नाले, बंधारे तुडुंब भरले, तरीही उन्हाळ्यात टँकर सुरू करावे लागत आहेत. नगर तालुका टँकरमुक्त करण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम गावोगावी सक्रियपणे राबवण्याची गरज आहे.
भौगोलिक संरचनेनुसार डोंगर उतारावर वसलेल्या गावांनी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात, हे वास्तव आहे. अशा गावांनी पशुधनाच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. जेऊर परिसरातील वाड्या-वस्त्यांवरही पाणीटंचाईची समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. येथेही लवकरच टँकर सुरू करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आणखी काही गावांचे टँकरसाठी प्रस्ताव दाखल होण्याची चिन्हे आहेत. 44 गावांच्या बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी तीन -चार दिवसांपासून नादुरस्त झाल्याने येथील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेली गावे
इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, मदडगाव, रांजणी, अकोळनेर, खांडके, भोयरेपठार, बाळेवाडी, भोयरे खुर्द, उक्कडगाव, सांडवे या बारा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. कोल्हेवाडी गावाने टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे.
बहिरवाडी गावाला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवते.
-अंजना येवले, सरपंच, बहिरवाडी
सांडवे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली असून, गेल्या महिनाभरापासून गावकरी पाणीटंचाईचा सामना करत होते. आता टँकर सुरू झाले आहेत.
-बापू खांदवे, सरपंच, सांडवे