

राजेंद्र बोरसे
श्रीरामपूर: अवकाळी पाऊस, प्रखर उन्हाळा अशातचं घसरलेले बाजारभाव, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी भाव, मजुरीचे वाढलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. या बिकट पार्श्वभूमीवर त्यांच्या डोळ्यातून कडू अश्रू येत आहेत.
यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला लेकरासारखे जपले, मात्र कांदा काढण्यावेळीचं अवकाळी पावसाने जबर तडाका दिला. पातींमध्ये पाणी शिरल्याने कांदा जमिनीतचं सडला.
शेतात कापून ठेवलेल्या कांदा पोळीमध्ये पाणी शिरल्याने कांदा सडल्या. ‘अवकाळी’च्या तडाख्यामधून जो कांदा वाचला होता, तो काढण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. आव्वाचे- सव्वा हजेरी देऊन, शेतकऱ्यांना कांदा काढावा लागला. बाजार समितीमध्ये कांदा रिकाम्या गोणी दारात वाढ झाली आहे. तेथेही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
निसर्गाच्या संकटातून वाचलेला कांदा विक्रीसाठी कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणला असता, व्यापाऱ्यांकडून कांद्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत मनमानी दर दिला. किमान कांदा पिकवण्यासाठी केलेला सर्व खर्च निघून, दोन पैसे हातात येतील, अशी आशा बाळगून कांदा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाचं पडली आहे. विकलेल्या कांद्यातून केवळ वाहतूक खर्च निघून, किरकोळ रक्कम हातात पडल्यामुळे शेतकरी अक्षरशः हातबल झाला आहे.
कांद्याला आज ना उद्या चांगला दर मिळेल, या अशाने सध्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण व्यवस्था उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवला, मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे कांदा चाळी अक्षरशः तापतात. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या गुणवत्तेवर होत आहे. अनेक ठिकाणी कांदा सडला आहे. दिवस-रात्र मेहनत करून जपलेला कांदा हातातून निसटताना पाहून, शेतकऱ्यांची मनःस्थिती बिकट झाली आहे. कांदा विकावा तर भाव नाही आणि साठवून ठेवावा तर तो सडतो, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून कांदा लागवड केली, मात्र सततच्या नैसर्गिक संकटांसह बाजार भावातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. बँकांचे कर्ज, खासगी सावकारांचे वाढते व्याज आणि घरखर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी अक्षरशः बेजार झाला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरता यामध्ये भरडल्या जाणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे.
‘अवकाळी’मध्ये सापडलेला कांदा व उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहेत. वरून कांदा चांगला दिसतो, मात्र, खरेदी करून तो विकण्यास नेला असता, अवघ्या चार- पाच दिवसांत वाहनामध्ये खराब होतो. गोण्यांमधून पाणी बाहेर येते. यामुळे विक्रीस नेलेल्या कांद्याला ग्राहक मिळत नाही. खराब कांदा फेकण्याची वेळ ओढवल्यामुये व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांमध्ये कांदा भावामध्ये वाढ होऊ शकते.
- नवनाथ सलालकर, कांदा व्यापारी.
जिल्ह्यातून एकाचवेळी सर्व कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आला. ‘अवकाळी’ने कांदा खराब झाला. यामुळे यंदाव्यापाऱ्यांनी जागेवर कांदा खरेदी केला नाही, मात्र व्यापारी कांदा खरेदी करुन, चार- पाच दिवसांनी तो दक्षिण भारतात पाठवतात. पाच दिवस कांदा वाहनांमध्ये असल्यामुळे कांदा खराब होत आहे. यामुळे तेथे ग्राहक कांदा विकत घेत नाहीत. ‘अवकाळी’मध्ये झोडपलेला कांदा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत भावामध्ये वाढ होणे शक्य नाही. येत्या काही दिवसांमध्ये कांदा तेजीमध्ये येईल.
- साहेबराव वाबळे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती