डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: महायुती दुभंगल्यानंतर शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर भाजप-राष्ट्रवादीची युती झाली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सूर मात्र जुळले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी पक्षाकडून डावलले गेलेल्यांनी पक्षनिष्ठा खुंटीला टांगल्याचे दिसून आले.
उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षाकडे आलेल्या आयारामांना प्राधान्य देत त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता बंडखोरी रोखण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे ठाकले आहे. माघारीसाठी दोन दिवस असल्याने बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांंची मनधरणी करण्याची कसरत करावी लागणार आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्या सौभाग्यवती शीला चव्हाण, उबाठा सेनेचे निष्ठावंत गिरीश तुकाराम जाधव, हर्षवर्धन कोतकर, प्रदीप परदेशी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकली. भाजपने डावलल्याने निष्ठावंतांनी ऐनवेळी शिवसेनेकडे धाव घेत धनुष्यबाण उचलले. भाजपच्या संगीता खरमाळे, नितीन शेलार, नरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेविका गौरी नन्नवरे व राष्ट्रवादीचे अमित खामकर, अभिजीत भिंगारदिवे, निर्मला गिरवले यांनीही शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे.
भाजप-राष्ट्रवादीची युती झाली असली तरी उमेदवारी देताना अनेकांच्या सोईसाठी एकमेकांच्या चिन्हांची अदलाबदल करण्याची वेळ आली. राष्ट्रवादीच्या रोशनी प्रवीण भोसले-त्रिंबके, सागर राजू मुर्तडकर, विकास किशोर वाघ आणि सेनेचे विजय मोहन पठारे, ज्ञानेश्वर शिवाजी येवले यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपच्या गीतांजली सुनील काळे, आशा किशोर डागवाले, महेश तवले आणि सेनेच्या सुनीता भगवान फुलसौंदर आणि सुनीता महेंद्र कांबळे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे.
कोण कोणाकडून...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार: शीला दीप चव्हाण, प्रदीप परदेशी, गिरीश तुकाराम जाधव.
राष्ट्रवादी काँग्रेस: गीतांजली सुनील काळे, महेश रघुनाथ तवले, सुनीता भगवान फुलसौंदर, आशा किशोर डागवाले, सुनीता महेंद्र कांबळे
भारतीय जनता पक्ष: रोशनी प्रवीण भोसले-त्रिंबके, आशाबाई लोभाजी कातोरे, पद्माताई विजय बोरुडे, शीतल अजय ढोणे, सागर राजू मुर्तडकर, विकास किशोर वाघ, विजय मोहन पठारे, ज्ञानेश्वर शिवाजी येवले
शिवसेना: उषा मंगेश भिंगारदिवे, संगीता खरमाळे, नितीन शेलार, अमित खामकर, शांता दशरथ शिंदे, नरेंद्र कुलकर्णी, अभिजीत भिंंगारदिवे, निर्मला कैलास गिरवले, हषवर्धन कोतकर, गौरी गणेश नन्नवरे.