शशिकांत पवार
नगर तालुका: वाढलेली बिबट्यांची संख्या.. पशुधनांवर होणारे हल्ले अन् मानव वस्तीत बिबट्यांचा वावरामुळे वनविभाग सतर्क झाला आहे. खारेकर्जून येथील चिमुकलीचा बळी तर निंबळक येथील बालकावरील हल्ल्यानंतर नगर, नेवासा तालुक्यामध्ये सोळा वनाधिकारी, सात वनमजूर बिबट्यांच्या हालचालींवर ‘वॉच’ ठेवून आहेत. त्यांच्या मदतीला ड्रोनची ही करडी नजर बिबट्यांवर आहे. नगर तालुक्यात 37 तर नेवासा तालुक्यात 15 पिंजरे बिबटे जेरबंद करण्यासाठी लावण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.
नगर तालुक्यातील 110 गावांसाठी वनविभागाचे नगर, जेऊर व गुंडेगाव असे तीन मंडळ कार्यरत आहेत. तीन मंडळामध्ये वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर वनक्षेत्र तर आर्मीचे बाराशे हेक्टर व खासगी डोंगररांगा देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यांमध्ये गर्भगिरीच्या डोंगररांगा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. प्रत्येक मंडळात वनपाल, तीन वनरक्षक असे नऊ वनरक्षक तीन वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक उपवनसंरक्षक आणि उपवन संरक्षक अशा पंधरा अधिकाऱ्यांचा बिबट्यांवर ‘वॉच’ आहे.
खारे कर्जुने परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नगर तालुक्यामध्ये 37 पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. नगर मंडलामध्ये सर्वाधिक 23, जेऊर मंडळ 7 तर गुंडेगाव मंडळामध्ये सात पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. अपुरे मनुष्यबळ अन् साधनांची कमतरता या समस्यांनी वनविभाग देखील हातबल झाल्याचे दिसून येते. 110 गावांचा भार 12 अधिकारी व पाच वनमजुरांवर अवलंबून आहे. आपत्कालीन परिस्थितीत वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वनविभागाने ॲक्शन मोडवर आल्यानंतर आठ बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. खारेकर्जूने परिसरात दोन, तपोवन रोडवरील कराळे मळ्यात चार, मजले चिंचोली एक तर नेवासा येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे.
उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षक अश्विनी दिघे, वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कामकाज सुरू आहे. जेऊर मंडलामध्ये वनपाल विठ्ठल गोल्हार, जेऊर वनरक्षक मनेष जाधव, डोंगरगण वनरक्षक हरी आठरे, देहरे वनरक्षक राजश्री राऊत तर अहिल्यानगर मंडळामध्ये वनपाल नितीन गायकवाड, नगर वनरक्षक विजय चेमटे, विळद वनरक्षक सुनील धोत्रे, शेंडी वनरक्षक बाळू रणसिंग तसेच गुंडेगाव मंडलामध्ये वनपाल शैलेश बडदे, कामरगाव वनरक्षक कृष्णा गायकवाड, गुंडेगाव वनरक्षक अशोक गाडेकर, कौडगाव वनरक्षक अर्जुन खेडकर कार्यरत असून त्यांच्या मदतीला पाच वनमजूर आहेत. या सर्वांवरच वनविभागाची धुरा अवलंबून आहे.
नेवाशाचा भार अहिल्यानगरवर!
अहिल्यानगर वनपरिक्षेत्राच्या अधिपत्याखाली नेवासा तालुक्याचाही समावेश आहे. नेवासा तालुक्यातील 172 गावांसाठी एक वनपाल, तीन वनरक्षक व दोन वनमजूर कार्यरत आहेत. नेवासा तालुक्यात वनविभागाचे सुमारे एक हजार हेक्टर वनक्षेत्र आहे. परंतु तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथे बिबट्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे नेवासा तालुक्याची जबाबदारी देखील अहिल्यानगर वनविभागाच्या कार्यालयावरच आहे.
नेवासा तालुक्यात 15 पिंजरे!
नेवासा तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तालुक्यामध्ये 15 पिंजरे बसविण्यात आलेले आहेत. वनपाल वैभव गाढवे, घोडेगाव वनरक्षक राहुल सिसोदे, नेवासा वनरक्षक भाऊसाहेब धुंडे, महालक्ष्मी हिवरे वनरक्षक स्वरा मडके यांच्यावर नेवासा तालुक्याची जबाबदारी आहे. त्यांच्या मदतीला वेळोवेळी नगर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जावे लागते.