

नगर: अहिल्यानगर शहरातील भोसले आखाडा परिसरात सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात वाजविला जाणारा डीजे बंद करण्यास सांगणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत झटापट करण्यात आली. शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी डीजे मालकासह आठ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीत भालेराव, इन्तीयाज बागवान, ईश्वर धिवर, हर्षल गायकवाड, तुषार घायमुक्ते, मच्छींद्र घायमुक्ते, विकी माने आणि हळदीची नववधू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिस नाईक संदीप साठे हे त्यांच्या सेक्टर ड्युटीवर कार्यरत असताना, त्यांना पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी मध्यरात्री भोसले लॉनच्या पाठीमागे डीजे सुरू असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिस नाईक साठे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे डीजेच्या तालावर काहीजण नाचत होते. देशमुख यांनी डीजे बंद करून शांतता राखण्याची सूचना केली. मात्र, काही युवकांनी त्यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या अंगावर धाव घेतली.
इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबतही झटापट करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. हळद लावलेल्या नववधूनेही पोलिसांना सुनावले. अन्य सात ते आठ युवकांनी आणि काही महिलांनी पोलिसांशी झटापट केली. त्यामुळे बळाचा वापर करत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच, डीजेचा टेम्पो आणि जनरेटर जप्त केला.
पोलिसांचे शासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा तसेच ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहीत भालेराव, इन्तीयाज बागवान, ईश्वर धिवर, हर्षल गायकवाड, तुषार घायमुक्ते, मच्छींद्र घायमुक्ते, विकी माने आणि हळदीची वधू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डिजे बंद करणार नाही, जे करायचे ते करा; नववधूची धमकी
हळद असलेली वधूने पोलिसांसमोर येऊन, आम्ही डीजे बंद करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे सुनावले. नववधूने मोबाईलवर शुटिंग सुरू केले. मी चित्रीकरण (शुटिंग) करत आहे. माझ्या भावांना सांगितले तर ते तुम्हाला सोडणार नाहीत, अशी धमकी दिली. चौकशीत डीजे मालक विकी माने हा देखील तेथे उपस्थित होता आणि त्यानेही पोलिसांशी अरेरावी करून नंतर तो पळून गेल्याचे समोर आले.