नगर: गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगूल अखेर सोमवारी (दि.18) वाजला. त्यामुळे निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हाभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी झेडपी व भिंगार कॅन्टोन्मेट वगळता सोळा संस्थांचे 461 सदस्य मतदार म्हणून पात्र आहेत. ही निवडणूक मतपत्रिकेवर होणार असून, पसंतीक्रमानुसार मतदानाची संधी उपलब्ध आहे.
या मतदारसंघाचे आमदार दिवंगत अरुणकाका जगताप यांचा सहा वर्षांचा कालावधी 1 जानेवारी 2022 रोजी संपला. काही नगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे रखडल्या. निवडणुकीसाठी आवश्यक संस्था आणि मतदारसंख्या 75 टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नव्हता. गेल्या वर्षी 12 नगरपालिकांच्या आणि नुकतीच महापालिकेची निवडणूक झाली. त्यामुळे झेडपी व कॅन्टोन्मेट भिंगार वगळता उर्वरित सर्व संस्था कार्यान्वित झाल्या आहेत. मतदार संख्यादेखील 75 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवली गेल्याने भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे निवडणूक निर्णय अधिकारी तर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते हे सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव व जामखेड या अकरा नगरपालिका तसेच अकोले, पारनेर, कर्जत व नेवासा या चार नगरपंचायती, अहिल्यानगर महापालिका, झेडपी व भिंगार कॅन्टोन्मेट आदी 18 स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेले सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या मतदारसंघाचे मतदार असतात. मात्र, जिल्हा परिषद आणि कॅन्टोन्मेंट आदी संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे सोळा संस्थांमध्ये सध्या 461 सदस्य मतदानासाठी पात्र आहेत. 18 जूनला मतदान होणार असून, 22 जूनला निकाल जाहीर होणार आहे.
टेकावडे, गडाख व जगताप दोनदा आमदार
या मतदारसंघातून फलके गुरुजी, मारुतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, ज.य. टेकावडे, यशवंतराव गडाख, अरुणकाका जगताप हे निवडून गेले आहेत. टेकावडे यांनी 1985 मध्ये माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा एक मताने पराभव केला होता. 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत अरुणकाका जगताप यांनी माजी आमदार जयंत ससाणे यांचा पराभव केला होता. टेकावडे, गडाख आणि जगताप यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
एकूण पात्र मतदार
अहिल्यानगर महापालिका : 73, संगमनेर : 34, कोपरगाव : 34, राहाता : 23, श्रीरामपूर : 39, राहुरी : 28, देवळाली प्रवरा : 24, पाथर्डी : 23, श्रीगोंदा : 25, शिर्डी : 26, अकोले : 18, कर्जत : 19, पारनेर : 19, नेवासा 20, शेवगाव : 28, जामखेड : 28.
निवडणूक खर्चाचे बंधन नाही
महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघात नाव असलेली तसेच वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक खर्चाचे बंधन नाही. त्यामुळे उमेदवारांना हवा तेवढा खर्च करण्याची मुभा आहे.