नगर: महाराष्ट्रात गाजलेल्या कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथील सामूहिक बलात्कार आणि दरोड्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आल्यानंतर त्यातीलच एक आरोपी आता दरोडेखोरांच्या टोळीत सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहेे. शेवगाव तालुक्यातील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
शेवगाव येथे केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा तपास करताना पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून घरफोडीच्या 12 गुन्ह्यांची उकल झाली आणि 8 लाख 2400 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. रोहित नादर चव्हाण (वय 26 रा.चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर), बंटी टाबर चव्हाण (वय 27, रा. म्हरोळा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), करण शिरसाठ भोसले (वय 22), अज्ञान ऊर्फ राजू ऊर्फ सक्या वकिल्या भोसल्या (दोघे रा. पिंपळवाडी ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यातील सक्या वकिल्या भोसल्या हा ‘कोठेवाडी’च्या गुन्ह्यातील शिक्षा भोगून आल्याचे तपासात उघड झाले. विशाल टाबर चव्हाण (रा. म्हरोळा, ता. पैठण) याचा शोध सुरू आहे.
15 जानेवारी रोजी रात्री ढाकणेवस्ती (शेवगाव) येथे मायलेकीला चाकूचा धाक दाखवून दागिन्यांसह रोख रकमेची चोरी झाली होती. त्याच रात्री बोधेगाव परिसरातही पोलिसाच्या घरासह एकूण तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोहित नादर चव्हाण आणि त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. तसेच तो बाराबाभळी ते चांदबीबी महाल परिसरात येणार असल्याचेही समजले.
त्यानुसार पथकाने बाराबाभळी ते चांदबीबी महाल येथे छापा घालून रोहित चव्हाण, बंटी चव्हाण, करण भोसले व राजू भोसल्या या चौघांना पकडले. त्यांच्याकडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह 8 लाख 2 हजार 400 रुपयांंचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींवर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून घरफोडी, चोरीचे एकूण तीस गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, अंमलदार दीपक घाटकर, बिरप्पा करमल, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, भीमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, वंदना मोडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.