Ahilyanagar Truck Fire Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Truck Fire Investigation: कोपरगाव–येसगाव मार्गावर ट्रकला आग; पोलिसांवर गंभीर आरोप

टोलनाक्याजवळ ट्रकला आग लागल्याने खळबळ उडाली असून प्रकरणात पोलिसांच्या वसुलीच्या आरोपांवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: कोपरगाव-येसगाव रस्त्यावर बंद टोलनाक्याजवळ (ता. येवला) एक मालवाहू ट्रक आग लागून खाक झाला. या ट्रकमध्ये बंदुकीच्या गोळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅससदृश पदार्थाचा साठा असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यामुळे छोट्या गॅस कांड्या जोरात फुटत होत्या. दरम्यान, ‌‘वसुली‌’साठी ट्राफिक पोलिसांनीच ट्रकला आग लावल्याचा आरोप ट्रकमालकाने केला असून, येवला पोलिसांनी आरोपाचे खंडन करत ट्रकचालकाने आग लावल्याचा दावा केल्याचे समजते.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पिंपळगाव जलाल (ता. येवला, जि. नाशिक) परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाने घटनास्थळी तातडीने जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. काही तासांनंतर आग आटोक्यात आली. आगीत कांड्या फुटल्याच्या आवाजामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून वाहनमालक विक्रम सिंग (रा. येवला) यांनी ट्राफिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनीच वाहनाला आग लावल्याचा दावा त्यांनी केला असून, या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे संबंधित चालकानेच आग लावल्याचा दावा येवला पोलिसांनी केला आहे.

चालक जगतार सिंग (रा. पंजाब) यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‌‘मी पुण्याहून भटिंडा येथे आर्मीचे साहित्य घेऊन जात होतो. माझ्यासोबत आणखी चार ट्रक होते. ट्राफिक पोलिसांनी ‌‘नो एन्ट्री‌’चे कारण देत आम्हाला अडवले व तीस हजार रुपयांच्या दंडाची धमकी दिली. त्यानंतर वाद झाला. त्यांना गाडीची कागदपत्रेही दाखवली. त्या वेळी पाच ते सात पोलिस उपस्थित होते. त्यातील एक जण सिगारेट ओढत होता. मला ट्रकच्या मागे नेऊन मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आमच्या इतर चालकांनी चित्रित केला असून तो माझ्याकडे आहे,‌’ असा गंभीर आरोप त्यांनी केला. संबंधित पोलिसांना व मंत्री छगन भुजबळ यांना व्हिडिओ व फोटो दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांकडून महाराष्ट्रात बळजबरीने पैसे वसूल केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसून नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंत्री भुजबळांचे चौकशीचे आदेश

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नाशिक येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आणि संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT