Crop Sowing Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Kharif Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात ७९ टक्के खरीप पेरणी पूर्ण; सोयाबीन-कापसाने व्यापले निम्म्याहून अधिक क्षेत्र

पावसाच्या सरींमुळे पिकांना दिलासा; मात्र उर्वरित पेरणी आणि वाढीसाठी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

दीपक ओहोळ

नगर: जिल्ह्यात आतापर्यंत ७९ टक्‍के खरीप पेरणी झाली असून, सर्वाधिक पाथर्डी तालुक्‍यात ६१ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. अकोले तालुक्‍यात सर्वात कमी २१ हजार ४६६ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्‍या पावसाने पिकांना किंचित दिलासा मिळाला. मात्र, जिल्ह्याला दमदार पावसाची अपेक्षा आहे.

जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्‍यामुळे खरीप पेरणीला वेग येऊन आतापर्यंत ५ लाख ६० हजार ४२ हेक्‍टरवर खरीप पेरणीची नोंद झाली. मध्‍यंतरी पावसाने दडी मारली. त्‍यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. परंतु गेल्‍या तीन दिवसांपासून जिल्‍हाभरात कोठेना कोठे पावसाच्‍या सरी सुरु आहेत. त्‍यामुळे उगवण झालेल्‍या कापूस, सोयाबीन तसेच उडीद, बाजरी व इतर खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.

एकूण पेरणी झालेल्‍या क्षेत्रापैकी १ लाख ५० हजार २२५ हेक्‍टरवर सोयाबीन तर १ लाख ३३ हजार १० हेक्‍टरवर कापसाचा पेरा झाला आहे. या दोन पिकांनीच ५१ टक्‍के क्षेत्र काबिज केले आहे. याशिवाय जिल्ह्यात ९७ हजार२९० हेक्‍टरवर मका, ४१ हजार २८७ हेक्‍टरवर बाजरी, ७४ हजार ३७३ हेक्‍टरवर तूर, १८ हजार १५१ हेक्‍टरवर मुगाची तर ३५ हजार ८५५ हेक्‍टरवर उडदाची पेरणी झालेली आहे. अकोले, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, श्रीगोंदा व पारनेर तालुक्‍यांत आतापर्यंत पेरणीची सरासरी कमी आहे. उर्वरित पेरणीसाठी आणि पिकांच्‍या वाढीसाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT