पारनेर: भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी चौघे मुंबईहून येत होते. गुरुवारी पहाटे अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणीनजीक हा अपघात झाला.
शकील मोहम्मद शेख (वय 45), सलमा शकील शेख, (वय 42) इक्बाल शकील शेख (वय 23) आणि सुमैय्या शकील शेख (वय 18, सर्व रा. मालवण, मुंबई) अशी मृत चौघांची नावे आहेत.
शकील मोहम्मद शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथील आजारी असणाऱ्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने बुधवारी (दि.९) रात्री मुंबईहून निघाले. पहाटे दोनच्या सुमारास भाळवणी येथील हॉटेल संदीपसमोर समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने कारला जोराची धडक दिली.
या धडकेत कारमधील शकील मोहम्मद, सलमा शकील शेख, इक्बाल शकील शेख आणि सुमैय्या शकील शेख जागीच ठार झाले. पारनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला. मृताचे नगरमधील नातेवाईक अल्ताफ शब्बीर शेख (रा. बाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी टेम्पोचालकास ताब्यात घेतल्याचे समजते.