Crime News Pudhari
अहिल्यानगर

Kadus Crime: कडूसमध्ये ४२ वर्षीय महिलेची दगडाने डोक्यात वार करून निर्घृण हत्या; ग्रामस्थ आक्रमक

फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या उषा शिंदे यांचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात; आरोपींच्या अटकेसाठी सुपा पोलिस ठाण्यात ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

पारनेर-सुपा: तालुक्यातील कडूस येथे गुरुवारी (दि. ६) सकाळी घरातून फिरण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेची दगडाने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कडूस व परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सुपा पोलिसांनी अज्ञात ४ ते ५ इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे नाव उषा पांडुरंग शिंदे (वय अंदाजे ४२ वर्षे, रा. कडूस, ता. पारनेर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा शिंदे या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यांना दररोज सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास घरातून जवळच्या डोंगर परिसरात फिरण्यासाठी जाण्याची सवय होती. गुरुवारीही त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून बाहेर पडल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास परिसरात गुरे चारत असलेले नामदेव करंजुले यांना कडूस ते पाडळी रांजणगाव मार्गावरील लमाणबाबा टेकडीच्या पायथ्याजवळ, नामदेव भुजंगराव करंजुळे यांच्या गट क्रमांक २७२मधील शेतात शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या.

त्यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने सरपंच मनोज मुंगसे व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अहिल्यानगर येथे पाठविला आहे. या प्रकरणी अज्ञात ४ ते ५ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याचे सुपा पोलिसांनी सांगितले.

संध्याकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोरून बसून होते, विशेष म्हणजे यादरम्यान महिलांची संख्या लक्षणीय होती. या घटनेने कडूस ग्रामस्थ आक्रमक झाले असून, शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता सुपा पोलिस स्टेशनमध्ये ग्रामस्थांतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही यावर ग्रामस्थ ठाम राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदनानंतर संध्याकाळी पुन्हा विभागीय पोलिस अधिकारी शिरीष ओमने, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी व नातेवाईक, ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. परंतु आरोपींचा शोध लागेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला. पोलिस यंत्रणेकडून तपासासाठी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून, त्यातील काहींबाबत संशय बळावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT